अण्णा हजारे संजय राऊतांवर भडकले
Anna Hazare lashes out at Sanjay Raut

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 27 वर्षांनंतर भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या दिग्गजांचा पराभव झाला. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल
आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पराभवाचा धक्का बसला. यावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.
तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारेंवर निशाणा साधला होता. आता अण्णा हजारे यांनी ठाकरे आणि राऊतांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
दिल्लीत केजरीवालांचा पराभव झाला तेव्हा काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता अण्णा हजारेंवर टीका केली होती.
यावर अण्णा हजारे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले म्हणून मी केवळ उत्तर दिली. एरवी मी राजकीय विषयांवर बोलत नाही.
पण दिल्लीच्या निकालाबाबत सगळ्यांनीच प्रशंसा केली, एखादा माणूस चुकला असेल तर चुकू द्या. आपण कशाला त्यावर बोलायचे, असे म्हणत अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.
तर अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचं काम अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांनी केले नाहीतर ते राळेगणचेच दैवत होते. नाहीतर अण्णा हजारे यांनी दिल्ली कधी पाहिली असती?
रामलीला मैदान, जंतर मंतर रोड कधी पाहिला असता? त्यावेळी आंदोलनाला जो काही आवाका दिला त्यानंतर ते देशाला माहित झाले,
नाहीतर ते राळेगणचे दैवत होते. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले. मोदी सरकार असो किंवा शिंदे-फडणवीसांचे सरकार असेल त्यावेळी अण्णांनी राळेगणमध्ये कूसही बदलली नाही,
हे दुर्दैवाने सांगायला लागत आहेत. भ्रष्ट सरकारच्या बाजूने ते उभे राहिलेत. अण्णा हजारे यांची भूमिका संशयास्पद आहे, अशी टीका खा. संजय राऊत यांनी अण्णा हजारेंवर केली होती.
यावर बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचे जग समोरच्याला दिसते. चष्माच त्या रंगाचा आहे. मग जग तसंच दिसणारच, असा पलटवार त्यांनी संजय राऊत यांच्यावर केलाय.