महायुतीतील मंत्र्याची लेक वडिलांविरुद्ध विधानसभेच्या रिंगणात?
Grand coalition minister's daughter against her father in the assembly arena?

निवडणुकांसाठी नेते, आमदारांना खेचण्याचे प्रयत्न करणारे पक्ष आता विधानसभेसाठी मुला मुलींना उमेदवारीचे आमिष देण्याच्या तयारीला लागले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच सुरू झाली असून दावे-प्रतिदावे केले जात आहे.
नागपूर विदर्भातील नेता पुत्र आणि कन्या विधानसभेसाठी इच्छुक आहेत. काहींनी बंडाची तयारीदेखील केली आहे. अशा स्थितीत सर्व पक्षांचा डोळा तरुण बंडखोरांवर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी गृहमंत्री व काटोलचे आमदार अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल आणि अजित पवार गटाचे नेते
व अहेरीचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री परस्पर विरोधी गटाकडून लढणार असल्याचा दावा केला गेला.
या दाव्यामुळे वडिलांविरुद्ध मुलगा की मुलगी असा प्रश्न उद्भवला आहे. दोन्ही गटाचे समर्थक व कार्यकर्तेही संभ्रमात आले आहेत.
अनिल देशमुख यांच्या विरोधात त्यांच्या कुटुंबातील सदस्य उभा करणार असल्याचे धर्मरावबाबा आत्राम यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले. त्यांचा इशारा सलिल देशमुख यांच्याकडे होता.
याला अनिल देशमुख यांनी गुरुवारी प्रत्युत्तर दिले. ‘धर्मरावबाबा मुलीपासून वाचून राहा, तुमची मुलगीच आमच्या पक्षात येत आहे’,
अशा इशारा देशमुख यांनी दिला. आत्राम यांच्या मुलीने वडिलांविरुद्ध लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावाही त्यांनी केला.
सलिल देशमुख व भाग्यश्री आत्राम यांनी आपल्या गृह जिल्ह्यातील मतदारसंघात विधानसभेसाठी तयारी केली. सलिल यांचे एक दशकापासून प्रयत्न चालले आहेत.
२०१४ साली त्यांनी पश्चिम नागपुरातही चाचपणी केली होती. विधानसभेच्या तयारींतर्गत त्यांनी जिल्हा परिषदेत विजय मिळवला.
काही महिन्यांपूर्वी अजित पवार गटाकडून त्यांच्या नावाची चर्चाही उफाळून आली होती. मात्र, अनिल देशमुख परत सक्रिय होताच, त्यांचे नाव मागे पडले.
भाग्यश्री आत्राम यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. यापूर्वीच्या निवडणुकीत दोन वेळा त्यांचे नाव चर्चेत आले. आत्राम यांनी लोकसभा मतदारसंघात दावा करून कन्येसाठी जागा रिकामी करण्याची तयारी केली होती.
मात्र, भाजपकडे असलेला गडचिरोली मतदारसंघ सोडण्यात आला नाही. त्यामुळे येत्या विधानसभेत तेच राहतात की कन्येसाठी मतदारसंघ सोडतात, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.