राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर कोणाला किती फायदा होणार?

How much will it benefit anyone if Raj-Uddhav Thackeray come together?

 

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीच्या विचारलेल्या प्रश्नावर मोठं वक्तव्य केलं.

 

महाराष्ट्राच्या हितासाठी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्यास तयार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

 

आपण राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्यास तयार आहोत. पण राज ठाकरे यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राजकीय मैत्री ठेवू नये,

 

अशी अट उद्धव ठाकरे यांनी ठेवली. याच अटीमुळे शिवसेना यूबीटी पक्ष आणि मनसे पक्षांच्या प्रवक्त्यांमध्ये शाब्दिक चकमक रंगलेली बघायला मिळत आहे.

 

राज ठाकरे यांच्याकडून ठाकरे गटाची अट मान्य झाली तर उद्धव ठाकरेंचा पक्ष युतीसाठी सकारात्मक असणार असल्याचं खुद्द खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

ही अट ठेवताना संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली. तसेच या नेत्यांसोबत राज ठाकरे यांची डीनर डिप्लोमसी पार पडली.

 

त्यामुळे आपल्यासोबत युती करुन पडद्यामागून महायुतीला छुपा पाठिंबा दिला जाऊ नये, असं उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं म्हणणं आहे. तर राज ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यांनी देखील त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

 

एकत्र यायचं असेल तर अट न ठेवता एकत्र यावं. राज ठाकरे कमिटमेंट पाळणारे नेते आहेत. त्यामुळे त्याची चिंता करु नये. पण अशी अट ठेवली तर युती होणं शक्य नसल्याचे देखील संकेत मनसे नेत्यांकडून देण्यात आले आहेत.

 

तसेच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तर ठाकरे गटाककडून आपल्याला 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेला फसवणूक झाल्याचा आरोप केला. दोन्ही वेळेला युतीची चर्चा होते आणि ऐनवेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून फोन उचलला जात नाही,

 

अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली. तर मनसे नेते अमेय खोपकर यांनी ‘अशी अभद्र युती होऊ नये’, असं म्हटलं आहे. या सर्व घडामोडींच्या पलिकडे आता ठाकरे बंधू खरंच एकत्र आले तर त्यांना कितपत फायदा होईल? याबाबतही आपण विचार करु.

 

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिकांची भूमिका आहे. राज्यभरातील ग्राउंड लेव्हलवरील बहुसंख्य शिवसैनिकांसह मनसैनिकांची देखील हीच भावना आहे.

 

 

त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास दोन्ही पक्षांमध्ये एक वेगळं चैतन्य संचारण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही नेते एकत्र आले तर दोन्ही पक्षांचे कार्यकर्त्यांमध्ये दिलजमाई होईल. त्यामुळे मोठी ताकद निर्माण होईल. विशेष म्हणजे महाराष्ट्राला एक वेगळा पर्याय मिळेलं.

 

महाराष्ट्राच्या राजकारण गेल्या साडेतीन वर्षात धक्कादायक घडामोडी घडून आल्या आहेत. शिवसेना पक्षात फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे.

 

या राजकीय घाडमोडींमुळे महाराष्ट्राची जनता देखील नाराज आहे. या परिस्थितीत महाराष्ट्राला एक वेगळा पर्याय हवा आहे. दोन्ही बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राला एक नवा पर्याय मिळेल.

 

सध्याच्या परिस्थितीत दोन्ही ठाकरेंना एकमेकांची गरज आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना अपेक्षित यश मिळालं नाही.

 

तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे गटाच्या अनेक दिग्गज नेत्यांना आपल्याकडे वळवलं जात आहे. ठाकरेंचे अनेक चांगले शिलेदार त्यांना सोडून गेले आहेत. यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची ताकद राज्यभरात कमी झाली आहे.

 

दुसरीकडे राज ठाकरे यांना देखील विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे राहत असलेल्या मतदारसंघातच त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत जिंकून येऊ शकले नाहीत.

 

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा एकही आमदार निवडून आला नाही. यामुळे राज ठाकरे यांनादेखील सध्याच्या स्थितीत एका खमक्या राजकीय पक्षाच्या आधाराची गरज आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *