ओबीसी समाज अस्वस्थ;होऊ शकतो मतदानावर परिणाम ;नेत्यांचा महायुतीला इशारा
OBC community restless; polling may be affected; leaders warn grand alliance

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातून महायुतीच्या नेत्यांच्या वेळकाढूपणामुळे छगन भुजबळ यांना माघार घ्यावी लागली आहे. यामुळे ओबीसी समाज अस्वस्थ असून त्यांच्यात असंतोष धुमसत आहे.
त्याचा मतदानावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मंजिरी धाडगे आणि पुणे विभाग अध्यक्ष प्रितेश गवळी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत येथे दिला.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशांची पायमल्ली महायुतीच्या सरकारमधील नेत्यांनी केली.
यामुळे राज्यातील ओबीसींना डावलले जात असल्याची भावना संपूर्ण राज्यातील ओबीसी बांधवांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे समता परिषदेने महायुतीमधील नेत्यांचा या पत्रकार परिषदेत निषेध केला.
या प्रसंगी समता परिषदेचे पुणे शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, महिला अध्यक्षा वैष्णवी सातव, पुणे शहर कार्याध्यक्ष सागर दरवडे, कोथरूड विधानसभा अध्यक्ष प्रदीप हुमे, संगीता माळी, अविनाश चोरे, समीर धाडगे आदी उपस्थित होते.
यावेळी धाडगे म्हणाल्या की, ओबीसींचे नेतृत्व राज्य सरकार नाकारत असून मराठा समाजाने छगन भुजबळ यांच्या विरोधात जी बॅनरबाजी केली, त्याचे निमित्त करून ओबीसी नेतृत्व राज्यातून बेदखल करण्याचे हे कुटील कारस्थान आखले जात आहे.
गवळी म्हणाले, ‘‘ येत्या दोन दिवसात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि इतर ओबीसी संघटना बैठका घेऊन विचारविनीमय करणार आहेत.
यासंदर्भात भुजबळ यांचा निर्णय आमच्याकरता अंतिम असून त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखालीच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.’’