ठाकरे गटाचा नेता शिंदें सेनेच्या वाटेवर
Thackeray group leader Shinden on the way to the Sena

विधानसभा निवडणुकांचे वेध लागताच महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. २०१९ नंतर राज्यात झालेल्या राजकीय भूकंपांमुळे यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.
जागावाटपावरून दोन्हीकडे रस्सीखेच सुरु असून नाराजांचे राजकारण देखील आता सुरु झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला सध्या चार धक्के बसले असून
पाचवा धक्का देखील लवकरच बसण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीला देखील जिल्ह्यात दुसरा झटका बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुजित मिणचेकर हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा मतदारसंघात सुरू आहेत. ते आज उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महाविकास आघाडीला लोकसभेत मिळालेल्या यशानंतर आता पाठोपाठ विधानसभा निवडणुका होत आहेत. जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
दुसरीकडे, महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही सामील झाल्याने अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला आतापर्यंत समरजीत घाटगे, ए वाय पाटील, राहुल देसाई, के पी पाटील असे मोठे धक्के बसले असून
आगामी काळात आणखी काही धक्के बसण्याची शक्यता आहे. त्याच वेळी महाविकास आघाडीमध्ये देखील अनेक जण नाराज आहेत.
कोल्हापुरातील १० विधानसभा मतदारसंघांपैकी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुजित मिणचेकर हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हातकणंगलेची जागा सध्या काँग्रेसकडे असून राजूबाबा आवळे विद्यमान आमदार आहेत.
या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात देखील हातकणंगलेची जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता असल्याने निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले सुजित मिणचेकर
यांनी अपक्ष लढण्यापेक्षा महायुतीमध्ये शिंदे गटात किंवा भाजपचा मित्र पक्ष असलेल्या जनसुराज्य पक्षात जाण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
सुजित मिणचेकर हे उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती असून चर्चा करणार आहेत. तर शिंदे गटाची देखील बैठक होणार असून त्यात निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर लोकसभा निवडणुकापर्यंत सुजित मिणचेकर यांनी ठाकरे गट आणि शिंदे गटापासून समसमान अंतर राखून ठेवलं होतं.
मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आपण ठाकरे गटासोबत असल्याचे स्पष्ट केले. यानंतर जागा वाटपात हातकणंगले लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आल्यानंतर
आणि राजू शेट्टी यांच्याशी चर्चा थांबल्यानंतर उद्धव ठाकरे पक्षाकडून उमेदवारीसाठी सुजित मिणचेकर, उल्हास पाटील आणि सत्यजित पाटील सरुडकर यांची नावे चर्चेत होती, मात्र यामध्ये सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.