भाजपच्या त्या गेम मुळे समर्थकांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंना दिला इशारा
Due to that BJP's game, supporters directly warned Chief Minister Shinde
काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांना शिवसेनेत प्रवेश देऊन रामटेकमधून लढवायचे आणि विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता कट करायचा,
यासाठी भारतीय जनता पक्षाने पडद्यामागे खेळी सुरू केली असल्याचा तुमाने समर्थकांचा आरोप आहे. शिंदेंच्या सैनिकांनीही
आता तुमानेंसाठी कंबर कसली आहे. भाजपची ती खेळी कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघातून खासदार कृपाल तुमाने यांना डावलून दुसरा उमेदवार लादल्यास आम्ही काम करणार नाही, असा थेट इशारा शिंदे सेनेचे पदाधिकारी व तुमाने यांच्या समर्थकांनी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. त्यामुळे येथील उमेदवारीवरून आणखी पेच वाढला आहे. उमरेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना
शिवसेनेत प्रवेश देऊन रामटेकचा उमेदवार करण्याचा हालचाली सुरू आहेत. यास शिवसैनिकांचा विरोध आहे. आपल्याकडे उमेदवार
असताना दुसऱ्याची गरजच काय असा सवाल मुख्यमंत्र्यांना फोनवरून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार यांनी केला.
कृपाल तुमाने यांनी रामटेकमधून सलग दोन वेळा निवडणूक जिंकली आहे. लोकसभा मतदारसंघातील १९६० गावांतील नागरिकांसोबत त्यांचा प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद आहे.
त्यांच्या विषयी मतदारसंघातील मतदारांची कुठलीच नाराजी नाही. जे विरोध करीत आहेत ते फक्त राजकीय कार्यकर्ते आहेत. त्यांच्या बोलविता धनी काही इच्छुक उमेदवार आहे.
भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्याने केवळ तुमाने यांना विरोध दर्शवण्यासाठी राजू पारवे यांची सोय केली जात असल्याचा आरोप जिल्हा प्रमुख इटकेलवार यांचा आहे.
पूर्व विदर्भात कृपाल तुमाने हे शिवसेनेचे एकमेव खासदार आहेत. रामटेक मतदारसंघ सोडल्यास संसदेत आवाज उठवण्यासाठी
शिवसेनेचा एकाही लोकप्रतिनिधी शिल्लक राहणार नाही. शिवसेनेच्या विस्तारालाही ब्रेक लागेल असेही इटकेलवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रामटेकमधील राजकीय परिस्थिती फोनवरून सांगितली. त्यांनीसुद्धा उमेदवार बदलणार नाही आणि मतदारसंघही सोडणार नाही,
असे आश्वासन दिले. तुम्ही कामाला निवडणुकीच्या प्रचाराला लागा, असे शिंदेंना सांगितल्याचे जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार यांनी सांगितले.
खासदार तुमाने यांना डावलल्यास आम्ही निवडणुकीत काम करणार नाही. आपल्याकडे सक्षम उमेदवार असताना इतर पक्षातून उमेदवार आयात करण्याची गरज नाही.
तुमाने यांच्या नावाला काही राजकीय कार्यकर्त्यांचा विरोध आहे. जनता शिवसेना आणि तुमाने यांच्यासोबत आहे, असेही इटकेलवार म्हणाले.









