भामट्याने राज्यपाल करतो म्हणून पाच कोटींचा गंडा घातला
A scoundrel embezzled five crores just because he was the governor.

राज्यपाल पद मिळवून देण्याचे आमिष दाखवित तामिळनाडूतल्या शास्त्रज्ञाला पाच कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या नाशिकच्या महाठगाचे बिंग फुटल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी संशयित निरंजन सुरेश कुलकर्णी (वय ४०, रा. गंधर्व नगरी, नाशिकरोड)
याला नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेने नागपुरात बेड्या ठोकल्या. राज्यपालपद देण्यासाठी त्याने तब्बल पंधरा कोटी रुपयांचा ‘सर्व्हिस चार्ज’ मागितल्याचेही समोर आले आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने संशयिताला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
तामिळनाडू राज्यातील चेन्नईतील थिरुवन्मीयूरमध्ये राहणारे व्यावसायिक व शास्त्रज्ञ नरसिम्मा रेड्डी दामोदर रेड्डी अपुरी (वय ५६) यांनी मुंबई नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे.
त्यानुसार नाशिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने निरंजन कुलकर्णी याला अटक केली. रेड्डी यांनी ७ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०२४ या कालावधीत संशयिताला ५ कोटी ८ लाख ९९ हजार ८७६ रुपये दिले आहेत.
त्यापैकी साठ लाख रुपये रोख रक्कम असून, उर्वरित पैसे स्वत:सह नातलगांच्या बँक खात्यातून रेड्डींनी संशयिताच्या बँक खात्यात जमा केले होते.
संशयिताचा डाव लक्षात आल्यावर रेड्डींनी पैसे परत मागितले. त्यावेळी पैसे परत देण्यास नकार देत फोनवरून संशयिताने रेड्डींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, राजकीय वलय असलेल्या या गुन्ह्याच्या नोंदीनंतर शहर पोलिसांवर राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते.
मात्र, पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळून संशयिताला अटक करून रविवारी (दि. ८) संशयितास न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर मुंबई नाका पोलिसांकडून प्रकरणाचा खुलासा करण्यात आला.
संशयित कुलकर्णी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्म जागरण विभागाचा कार्यकर्ता होता. त्यातून राजकीय वर्चस्व निर्माण केल्याचा दावा त्याने नागरिकांमध्ये केला.
काही महिन्यांपासून तो संघटनेत सक्रीय नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचे वडील महावितरण विभागातून दहा वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहेत.
संशयिताचे राजकीय पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांसमवेत बरेच फोटो आहेत. ‘हायप्रोफाइल लाइफस्टाइल’ जगण्याची त्याला हौस होती.
त्याच्याकडील कारवर ‘खासदार’ असा शासकीय लोगो होता. कौटुंबिक कलहामुळे त्याची पत्नी विभक्त राहत असल्याचे कळते. सतत राजकीय वर्तुळात वावरताना त्याने अनेकांना फसविल्याची माहिती पोलिसांकडे आहे. त्यासंदर्भातील तपास सुरू आहे.
संशयिताने कोट्यवधी रुपये कुठे दडवले? याचा तपास सुरू आहे. हॉटेलिंग, मौजमस्तीत पैसे खर्च केल्याचे समोर आले आहे. संशयिताच्या वडिलांच्या नावे मुदत ठेवीच्या नोंदी आढळल्या आहेत.
नागपुरातील हॉटेलातून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. १७ डिसेंबरपर्यंत नाशिक पोलिसांच्या कोठडीत असून मध्यवर्ती गुन्हे शाखेचा कसून तपास सुरू आहे.