मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेकडून दिग्गजांना दे धक्का
Shinde gives a blow to the veterans in the cabinet expansion

राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज नागपूरमध्ये होत आहे. संध्याकाळी 4 वाजता नागपूरमध्ये मोठ्या दिमाखात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
रात्रभर अनेकांनी मंत्रिपदाची माळ गळ्यात पडावी यासाठी लॉबिंग केले. थंडीच्या कडाक्यातही नागपूरमध्ये वातावरण तापले. नागपूरमध्ये मंत्रिमंडळाच्या शपथविधीची ही दुसरी वेळ आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या 12 आमदारांना फोन गेल्याची माहिती भरतशेठ गोगावले यांनी दिली. यामध्ये सहा नवीन चेहऱ्यांना तर
माजी मंत्र्यांना सुद्धा संधी देण्यात आल्याचे समोर आले आहे. पण या यादीत दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट झाल्याचे दिसून येत आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत 288 पैकी 232 जागा जिंकत महायुतीने राज्यात झंझावात आणला. निकालानंतर दहा दिवस उलटल्यानंतर 5 डिसेंबर रोजी महायुती सरकार सत्तारूढ झाले.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदी, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिपदाची यादी फायनल झाल्याचे सांगीतले जाते.
दरम्यान महायुतीमधील घटक पक्ष शिवसेनेकडून 12 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच समोर आले आहे. भरतशेठ गोगावले यांनी या 12 जणांच्या नावेच जाहीर केली. त्यामध्ये उदय सामंत, दादा भुसे,
शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले, अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, विजय शिवतारे, आशिष जैस्वाल आणि योगेश कदम यांची नावे अंतिम झाल्याची माहिती गोगावले यांनी दिली.
या नवीन चेहर्यांना संधी
मराठवाडा संभाजीनगरमधून संजय शिरसाट
मराठवाडा जालना येथून अर्जुन खोतकर
रायगडमधून भरतशेठ गोगावले
पश्चिम महाराष्ट्रातून प्रकाश अबिटकर
कोकणातून योगेश कदम
विदर्भातून आशिष जैस्वाल
ठाण्यातून प्रताप सरनाईक
या पाच जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी
कोकणातून उदय सामंत
पश्चिम महाराष्ट्रातून शंभुराज देसाई
उत्तर महाराष्ट्रातून गुलाबराव पाटील
उत्तर महाराष्ट्रातून दादा भुसे
विदर्भातून संजय राठोड
दरम्यान माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव या यादीत नसल्याने त्यांचा पत्ता कट झाल्याचे समोर आले आहे.
शुक्रवारी सावंत आणि केसरकर हे वर्षावर एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांना पाच तास ताटकळत राहावे लागले. मध्यरात्री त्यांना शिंदे यांनी भेट दिली.
तेव्हाच त्यांचा पत्ता कट होणार हे स्पष्ट झाले होते. अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना सुद्धा या यादीत स्थान देणार नसल्याचे समोर आले होते. पण संजय राठोड यांचे नाव यादीत झळकले आहे.