मराठवाड्यातील मोदींच्या मंत्र्यांना शह देण्यासाठी ‘मविआ’चा मास्टर प्लान
Master plan of 'Mavia' to support Modi's ministers in Marathwada

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावाचा समावेश आहे.
दानवे सलग सहाव्यांदा लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार? याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे.
जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सलग ५ वेळा खासदार
म्हणून निवडून आले आहेत. मात्र, यावेळी भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी महाविकास आघाडीने मास्टर प्लान आखला आहे.
जालना लोकसभेची जागा महाविकास आघाडीतून काँग्रेसला सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच दानवे यांना शह देण्यासाठी काँग्रेसकडून
डॉ. कल्याण काळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
मात्र, या यादीत कल्याण काळे यांचे नाव नाही. तरी देखील या जागेवर कल्याण काळे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सध्या कल्याण काळे यांनी जालन्यात आपला प्रचार सुरू केला असून ते काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
२००९ मध्ये डॉ. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी काळे यांचा अगदी मोजक्याच मतांनी पराभव झाला होता. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची झाली होती.
कल्याण काळे यांच्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराने दानवे यांना इतकी कडवी झुंज दिलेली नव्हती. त्यामुळे दानवे यांचा पराभव करायचा असेल, तर कल्याण काळे यांना उमेदवारी द्या, अशी मागणी काँग्रेस पदाधिकारी करीत आहेत.
सध्या या जागेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. कल्याण काळे यांच्याशिवाय जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,
सत्संग मुंढे, राजेंद्र राख, कल्याण दळे, ही नावे देखील चर्चेत आहेत. याशिवाय शिवसेना ठाकरे गटाकडून शिवाजीराव चोथे यांचेही नाव चर्चेत आहे.