मराठा आंदोलन ;एसटी महामंडळाच्या मराठवाड्यातील बस थांबल्या
Maratha Movement: ST Corporation's Marathwada buses stopped

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मराठवाड्यातील काही भागांत शनिवारी (ता. १७) चौथ्या दिवशीही रास्ता रोको आणि उपोषण करण्यात आले.
बीड, जालना, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील एसटी बससेववर याचा परिणाम झाला. नांदेड, हिंगोली आणि
धाराशिव जिल्ह्यातील बससेवा सर्वाधिक प्रभावित झाली. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये शनिवार ३ हजार ३०० बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या.
सर्वांत जास्त बसफेऱ्या नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात रद्द कराव्या लागल्या. नांदेड जिल्ह्यात ८० टक्के बसफेऱ्या बंद होत्या.
धाराशिव जिल्ह्यातील केवळ २० ते ३० टक्के बसफेऱ्याच सुरू होत्या. शनिवारी मराठवाड्यात दिवसभरात ३ हजार ३०० बसफेऱ्या रद्द झाल्या. सुमारे ३ लाख किलोमीटरचा प्रवास आज होऊ शकला नाही.
खुलताबाद आणि सिल्लोड येथे रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील बसफेऱ्या सुरळीत झाल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली.
नगर-बीड राज्यरस्त्यावर घाटसावळी (ता. बीड) फाट्यावर समाजबांधवांनी ठिय्या मांडून ‘रास्ता रोको’ केला. चंदन सावरगाव (ता. केज), धानोरा (ता. आष्टी), कौडगाव (ता. परळी), लोणाळा फाटा (ता. गेवराई)
आदी ठिकाणीही रास्ता रोको करण्यात आला. गेवराईत तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन झाले. आंदोलनात महिलांचाही सहभाग वाढत आहे. माजलगावला सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले.
जालना-बीड महामार्गावर जालना शहरालगत असलेल्या इंदेवाडी येथे सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांनी भाजप नेते नारायण राणे यांचा निषेध केला.
आंदोलकांनी रस्त्यावर बैलगाडी, ट्रॅक्टर आडवे लावले होते. महिलांनी महामार्गावर चूल पेटवून स्वयंपाक केला. त्यामुळे दीड तास वाहतूक खोळंबली.
जालना तहसीलदार छाया पवार यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारल्यानंतर पोलिस प्रशासनाने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.
दरम्यान, शनिवारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १५० बसफेऱ्या रद्द केल्याने सव्वादोन लाखांचा महसूल बुडाला आहे.
जिल्ह्यातील नऊ आगारांतील एकूण १ हजार ५३६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ४० लाख ६१ हजार रुपयांचे नुकसान झाले. नांदेड-वसमत,
नागपूर-नांदेड महामार्गावर पळसा (ता. हदगाव) आणि देगलूर येथे ‘रास्ता रोको’ करण्यात आला. नायगावला खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांची गस्तही वाढवली.
बाहेरजिल्ह्यात जाणाऱ्या सर्वच बसेस बंद करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. एसटी महामंडळाला साडेतीन लाख रुपयांचा फटका बसला. दरम्यान, जिल्ह्याअंतर्गत बससेवा सुरू होती.
हिंगोली ते वाशीम मार्गावर खंडाळा पाटी येथे तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
जिल्ह्यातील आखाडा बाळापूर, माळेगाव फाटा, डोंगरकडा, गिरगाव फाटा येथेही ‘रास्ता रोको’ झाला. हिंगोली, वसमत, कळमनुरी आगारांतून बस धावली नाही.
उमरगा आगारातून बसफेऱ्या बंद होत्या. एकूण ८८ फेऱ्यांपैकी दुपारी चारनंतर २० फेऱ्या सुरू करण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख पी.व्ही. कुलकर्णी यांनी दिली.
कळंब आगारातीलही बससेवर परिणाम झाला. बस बंद असल्याने तुळजापूरला येणारे आणि तुळजापूरवरून जाणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागला.
सेलू तालुक्यात आठ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वालूर, कुंडी पाटी, पाथरी रेल्वेगेट, सेलू, हादगाव पावडे, मोरेगाव, देवगाव फाटा, गोगलगाव पाटी या ठिकाणी सकाळी रास्ता रोको आंदोलन झाले.
मोरेगाव येथे बैलगाड्या महामार्गावर सोडून ‘रास्ता रोको’ करण्यात आला. पालम तालुक्यातील पोखर्णी देवी येथील तीन तरुण पाच दिवसांपासून उपोषण करीत आहेत. झीरो फाटा येथेही आंदोलन झाले. जिल्ह्यातील बससेवा सुरळीत सुरू होती.