महाराष्ट्रातील विधासभा निवडणुकीत सेटिंग , राहुल गांधींनी दिली थेट ‘ही’ आकडेवारी
Setting for Maharashtra assembly elections, Rahul Gandhi gave direct 'this' statistics

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीत दिसणारा कल विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे बदलल्याची प्रतिक्रिया या निकालांवर व्यक्त करण्यात आली.
यासंदर्भात अनेक दावे-प्रतिदावेही केले गेले. या निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप राज्यातील विरोधी पक्षांकडून अर्थात महाविकास आघाडीकडून करण्यात येत होते.
आज लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत
यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबाबत सविस्तर आकडेवारी देऊन तीन महत्त्वाचे प्रश्न निवडणूक आयोगाला केले आहेत.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच राहुल गांधींनी ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त बदलण्याची प्रक्रियाच बदलल्याचा मुद्दा उपस्थित केला.
“निवडणूक आयोगाचे आयुक्त एका समितीकडून नेमले जात होते. त्यात सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान होते. त्यात सरकारकडून बदल करण्यात आला.
सरन्यायाधीशांना त्यातून बाहेर काढण्यात आलं आणि एका भाजपा व्यक्तीला त्या समितीत दाखल करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयुक्तांना हटवण्यात आलं आणि नव्या आयुक्तांना तिथे नेमण्यात आलं”, असं राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी गैरप्रकार केल्याचा दावा करताना राहुल गांधींनी तीन मुद्दे उपस्थित केले आहेत.
१. “विधानसभा निवडणूक २०१९ ते लोकसभा निवडणूक २०२४ या पाच वर्षांत ३२ लाख मतदारांचा याद्यांमध्ये नव्याने समावेश करण्यात आला. पण लोकसभा २०२४ ते विधानसभा २०२४ या पाच महिन्यांत ३९ लाख नवे मतदार समाविष्ट झाले.
लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यांत समाविष्ट झालेले मतदार आधीच्या पाच वर्षांतल्या मतदारांपेक्षा जास्त कसे? हे ३९ लाख मतदार कोण आहेत? आख्ख्या हिमाचल प्रदेशमध्ये ३९ लाख मतदार आहेत. आणि तेवढे नवे मतदार महाराष्ट्रात मतदार याद्यांमध्या समाविष्ट झाले आहेत”, असा मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केला.
२. “महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही महाराष्ट्रातील एकूण नोंदणीकृत मतदार जास्त कसे होतात? सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९.५४ कोटी आहे. पण निवडणूक आयोगानुसार महाराष्ट्रात त्याहून जास्त म्हणजे ९.७ कोटी मतदार आहेत.
लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अचानक हे मतदार तयार करण्यात आले आहेत”, असा दावा राहुल गांधींनी केला.
३. “महाराष्ट्रात विरोधी पक्षांना जितक्या मतदारांनी मतदान केलं त्यांची संख्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान अजिबात कमी झालेली नाही. काँग्रेसला लोकसभेत कामठी विधानसभा मतदारसंघात १.३६ लाख मतं मिळाली. विधानसभेत आम्हाला तिथेच १.३४ लाख मतं मिळाली.
यात फारसा फरक पडलेला नाही. पण या काळात या मतदारसंघात ३५ हजार नव्या मतदारांचा समावेश झाला आहे. दुसरीकडे भाजपाला लोकसभेत १.९ लाख मतं मिळाली होती. विधानसभेत त्यांना १.७५ लाख मतं मिळाली. यातले बहुतेक मतदार हे त्या नव्याने समाविष्ट झालेल्या ३५ हजार मतदारांमधून आले.
हे फक्त एका मतदारसंघातलं नाहीये. हे अनेक मतदारसंघांमध्ये दिसतंय. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मतदारसंघांमध्ये हे दिसून आलं आहे”, असा दावा राहुल गांधींनी केला आहे. महाराष्ट्रात आमची मतं कमी झालेली नाहीयेत, भाजपाची वाढली आहेत.
यावेळी राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे मतदार याद्या देण्याची मागणी केली आहे. “आम्ही निवडणूक आयोगाला हे सांगत आलोय. आम्हाला राज्यातल्या मतदारयाद्या हव्यात. त्यात मतदारांची नावं, पत्ते आणि फोटो हवेत.
आम्हाला लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्या हव्यात. आम्हाला हे पाहाचंय की हे नवे मतदार कोण आहेत? अनेक मतदारांची नावं हटवण्यात आली.
अनेक मतदारांची नावं एका बुथमधून दुसऱ्या बुथमध्ये समाविष्ट करण्यात आली. यातले बहुतेक मतदार हे दलित, आदिवासी, अल्पसंख्याक गटातले होते. आम्हाला हे समजून घ्यायचं आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.
“आम्ही यासाठी निवडणूक आयोगाला वारंवार विनंती केली आहे. पण त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं नाही. यात काहीतरी काळंबेरं आहे म्हणून ते उत्तर देत नाहीयेत. मी कोणताही आरोप करत नाहीये, मी इथे डेटा दाखवतोय”, असंही राहुल गांधींनी यावेळी नमूद केलं.
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपानंतर संजय राऊत यांनीही निवडणूक आयोगावर टीका केली. जर या देशातील निवडणूक जिवंत असेल, तर जे प्रश्न निवडणूक आयोगाला विचारण्यात आले,
त्यांनी त्याचे उत्तर दिलं पाहिजे. पण आयोग उत्तर देणार नाही. कारण हा आयोग सरकारची गुलामी करत आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे वारंवार जाऊन डोकं आपटलं.
पण निवडणूक आयोग मेला आहे. हे जे ३९ मते कुठून आले. आता हे ३९ लाख मते बिहारमध्ये जाणार. हे फ्लोटिंग वोट आहेत. तेच नाव, तेच आधारकार्ड राहिले. काही दिल्लीत आले आहेत. महाराष्ट्र पॅटर्न आणि आम्ही पाहिला. आता बिहारमध्ये जातील, नंतर यूपीत जाईल. हे लोक याच पॅटर्नने जिंकत आहे.
देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल, विधानसभा आणि लोकसभा जिवंत ठेवायची असेल तर सवाल केले पाहिजे. महाराष्ट्रात ते कसे जिंकले आणि आम्हाला कशा पद्धतीने हरवले हे आम्ही दाखवलं आहे. निवडणूक आयोगावर जे कफन टाकलं आहे. त्याचा त्यांनी उत्तर द्यावं, असे संजय राऊत म्हणाले.
यानंतर सुप्रिया सुळे यांनी बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा अशी जोरदार मागणी केली. “धैर्येशील मोहिते माढातून विजयी झाले. सोलापुरातून उत्तम जानकर आमदार बनले. सोलापूरमधून. त्यांच्या मते त्यांना जी मते मिळाली मरकडवाडी. मी निवडून आलो. पण पाहिजे तेवढे मते मिळाली नाही.
त्यांना परत निवडणूक हवी. बॅलेट पेपरवर हवी. पण निवडणूक घेतली जात नाही. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. पण मशीन बंद करा. राज ठाकरेंनीही त्यांच्या उमेदवाराला त्याचंही मत मिळालं नसल्याचं सांगितलं. आम्ही आणि शिवसेना तिथे लढलो. आमचा पक्ष फोडला. आमदार फोडले.
आम्ही अजूनही लढत आहोत. आम्हाला तुतारी चिन्ह दिलं. या सरकारमधील एक मंत्री आहेत. त्याने सांगितलं की, साताऱ्यातील सीट एनसीपी पराभूत झाली कारण ट्रम्पेट आणि तुतारीमुळे झाले. आम्ही तुतारी हटवण्याची मागणी केली. सेम चिन्हामुळे लोकांचा संभ्रम होत असल्याचं आम्ही सांगितलं. तरीही त्यांनी चिन्ह बदललं नाही. याच कारणामुळे आमची साताऱ्याची सीट गेली. ११ जागा आमच्या अशा गेल्या”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“मतदार, चिन्ह आणि पक्ष फोडण्याचा हा विषय आहे. आमच्यावर सतत वार होत आहे. लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी फेअर निवडणुका व्हाव्यात. आम्ही मतदार यादी मागत आहोत. त्या द्या. बाकी काय मागत आहोत”, असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला.
“ऑनलाईन नाव वाढवू शकतात. मी रोज मॉनिटर करायचे. शेवटच्या तीन दिवसात आम्ही निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना त्यावेळी ही नाव वाढली. लाडकी बहीण योजनेतही बोगस आधारकार्ड मिळाले आहेत”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
#WATCH | Maharashtra Election 2024 | Replying to a question by ANI, Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, "We need to clearly present the difference between two things. One is speculation – one can say that there were problems in the machines. The second is fact. I… pic.twitter.com/o08THl0QRw
— ANI (@ANI) February 7, 2025