मुंडेंच्या राजीनाम्यानंतर महायुतीत हालचालीत वाढ ,काहीतरी घडणार ?
After Munde's resignation, there has been an increase in activity in the Mahayuti, will something happen?

महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आरोपींनी किती निर्घृणपणे केली हे सिद्ध करणारे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत महायुतीत वेगवेगळे मतप्रवाह गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महायुतीत डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली.
महायुतीच्या समन्वय समितीची आज तातडीने बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
महायुतीच्या समन्वय समितीच्या नेत्यांची मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला भाजपकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण,
शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत, संदीपान भुमरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे हे नेते बैठकीसाठी उपस्थित आहेत. या बैठकीत विधीमंडळ समितीवर आमदारांच्या नियु्क्तीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दोन्ही दिवस हे वादळी ठरताना दिसले. पहिल्या दिवशी विरोधीपक्षांनी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
तर याच दिवशी रात्री संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो समोर आले. यामुळे अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला.
या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहात माहिती दिली नाही म्हणून विरोधक मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग लावण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
अशा परिस्थितीत विरोधकांचा सामना कसा करावा? याबाबत रणनीती आखण्यासाठी महायुतीच्या समन्वय समितीच्या नेत्यांची ही बैठक असण्याची शक्यता आहे.
अधिवेशनात विरोधकांच्या प्रत्येक आरोपांना कसं प्रत्युत्तर द्यावं हे ठरवण्याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी अधिवेशनाच्या एक दिवसआधी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांबाबतचं पत्र पाठवत जाब विचारला होता. त्यामुळे विरोधकांचा प्रतिकार कसा करावा? याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडे आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा कशाप्रकारे सामना करायचा याबाबतची रणनीती आजच्या बैठकीत ठरवली जाण्याची शक्यता आहे.