मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाह धक्कातंत्र वापरणार ?चर्चाना उधाण !

Will Amit Shah use shock tactics regarding the Chief Minister's post? Debate is heating up!

 

 

 

विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबतचे मळभ दूर व्हायला चार दिवस लागले.

 

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (दि. २७ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान मोदी जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल असे सांगितले.

 

शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडल्यानंतर आता भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदी कुणाला बसवायचे, याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जोर देत असताना

 

केंद्रीय नेतृत्व मात्र सर्व बाजूंचा विचार करताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात काल याविषयावर दीर्घ चर्चा झाल्याची माहिती वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात ४० मिनिटे चर्चा झाली. बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास त्याचा मराठा मतांवर काय परिणाम होईल,

 

याचा आढावा शाहांनी घेतला असल्याची माहिती मिळत आहे. आगामी निवडणुका, फडणवीसांचा चेहरा आणि मराठा-ओबीसी मतांबाबत शाहांनी माहिती घेतली.

 

एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा असताना केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील समीकरणे जाणून घेतल्याबद्दल भाजपाकडून इतर राज्यांप्रमाणेच धक्कातंत्राचा वापर केला जाणार का? यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

 

मागच्या दोन वर्षांत भाजपाने इतर राज्यांमध्ये प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला करून नवे नेतृत्व दिले आहे. मध्य प्रदेशमध्ये त्यांनी शिवराज सिंह चौहान यांच्या जागी डॉ. मोहन यादव, छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांच्याऐवजी विष्णू देव साय,

 

राजस्थानमध्ये वसुधंरा राजे यांच्याऐवजी भजनलाल शर्मा आणि हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांना बाजूला सारून नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रीपद दिले गेले.

 

भाजपाने इतर राज्यात ज्याप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करून नवे नेतृत्व समोर आणले, तसाच प्रयोग महाराष्ट्रात होणार का? हे येणाऱ्या दिवसांत समजू शकेल.

 

दरम्यान, अमित शाह हे आता मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करत असले तरी त्यांनीच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांचा विजय करा, असे उद्गार शिराळा येथील सभेत काढले होते.

 

या विधानामुळे महायुतीत काही वेळ चलबिचल पाहायला मिळाली होती. अमित शाह यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाचा मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत दिले, असे त्यावेळी म्हटले गेले. त्यानंतर भाजपाने लगेच त्यावर स्पष्टीकरण देत सारवासारव केली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *