राज्यात महायुतीची लाट! विधानसभेत विरोधी पक्षनेता बनण्यासाठीचीही संख्या नाही
Grand Alliance wave in the state! There are no numbers even to become the Leader of the Opposition in the Legislative Assembly

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची लाट आहे हे निकालाने स्पष्ट केलं आहे. कारण २०० हून अधिक ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
तर महाविकास आघाडीला आत्ताच्या कलांनुसार अवघ्या ५० जागांवर आघाडी मिळाली आहे. महाविकास आघाडीने आमच्या १८० जागा येतील असं वक्तव्य केलं होतं.
मात्र निवडणुकीच्या निकालात वेगळं चित्र पाहण्यास मिळतं आहे. महाविकास आघाडीत असलेले तीन पक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) या तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला
आत्तापर्यंत २८ ही आमदार संख्या पार करता आलेली नाही. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेताही नसेल अशा चर्चा होत आहेत. काय सांगतो याबाबतचा नियम आपण जाणून घेऊ.
सध्या जे कल आणि आघाडी पिछाडी कळते आहे त्यानुसार महायुतीचे उमेदवार २२० ते २२१ उमेदवार आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार ४९ ठिकाणी आघाडीवर आहेत.
ज्यामध्ये काँग्रेस २१, शिवसेना (उद्धव ठाकरे) १७ तर राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) १२ जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रात २८८ मतदारसंघ आहेत.
त्यातली सत्तास्थापनेची मॅजिक फिगर १४५ आहे. ही संख्या महायुतीने सहज गाठली आहे. मात्र २०२४ ते २०२९ या पाच वर्षांच्या कालावधीत विधानसभेला विरोधी पक्षनेता नसेल अशी चिन्हं आहेत. नियम काय आहे ते आपण जाणून घेऊ.
महाराष्ट्रात २८८ जागा आहेत, सरकार स्थापनेसाठीची मॅजिक फिगर १४५ आहे. तर विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी २८८ जागांच्या एक दशांश आमदार पक्षाकडे असणं आवश्यक आहे.
त्यामुळे २८८ च्या एक दशांश आमदार म्हणजेच २८ आमदार ज्या पक्षाचे असतील त्यांचा विरोधी पक्षनेता होईल. मात्र तसं चित्र तिन्ही पक्षांमध्ये दिसत नाही. जर विरोधी पक्षनेता निवडायचा असेल तर
२८ आमदार असणं गरजेचं आहे. मात्र ही संख्या महाविकास आघाडीतला पक्ष आत्ता तरी गाठताना दिसत नाही. त्यामुळे पाच वर्षांच्या कालावधीत विरोधी पक्षनेता नसेल अशी चिन्हं आहेत.
महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत यश मिळालं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीत राज्यात त्याच्या बरोबर उलटं चित्र पाहायला मिळालं आहे.
महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत ३१ जागा मिळाल्या होत्या. तर, महायुतीला १७ जागा मिळाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत बरोबर उलटं चित्र पाहायला मिळालं आहे. महायुतीला प्रचंड यश मिळालं आहे. महायुती साधारणपणे २२० जागा मिळवत यशस्वी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे.
लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं हे मी उत्तम लक्षण मानतो. त्यामुळे विरोधी पक्षांच्या आमदारांचाही आम्ही सन्मान करु त्यांचा जो योग्य सल्ला असेल तो आम्ही ऐकू असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.