राज ठाकरेंचा मराठवाड्यात तिसरा उमेदवार जाहीर

Raj Thackeray's third candidate announced in Marathwada

 

 

 

विधानसभा निवडणुका जाहीर होण्यासही वेळ असतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारांची घोषणा करण्यात आघाडी घेतली आहे.

 

तीन दिवसात मनसेने तीन उमेदवार जाहीर केले आहेत. मराठवाडा दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लातूरमध्ये तिसरा विधानसभा उमेदवार जाहीर केला आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संतोष नागरगोजे यांना लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. नवनिर्माण यात्रे दरम्यान राज ठाकरे यांनी जाहीर केले.

 

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख हे विद्यमान आमदार आहेत.

 

त्यांना महाविकास आघाडीकडून पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे. ते पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. त्यामुळे लातूर ग्रामीणमध्येही मनसे विरुद्ध महायुती विरुद्ध मविआ असा तिरंगी चुरशीचा सामना होणार आहे.

 

याआधी मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक बाळा नांदगावकर यांना मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर करण्यात आलं होतं.

 

तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सोमवारी मनसेकडून यासंदर्भात घोषणा करण्यात आल्या होत्या.

 

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे आमदारपदी विराजमान झाले. त्यांच्याविरुद्ध उमेदवार देत राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा देतानाच महायुतीच्या पर्यायावरही काट मारली.

 

दुसरीकडे, मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेचा उमेदवार देणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. राज ठाकरे यांनी २०० ते २२५ जागा लढवण्याची घोषणा केली आहे.

 

राज ठाकरे यांनी राज्यभरात नवनिर्माण यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. या दौऱ्याची सुरुवात सोलापूरहून झाली असून सांगता छत्रपती संभाजी नगर येथे होणार आहे.

 

या दौऱ्यात राज ठाकरे संबंधित जिल्ह्यातील निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. आता लातूर दौऱ्यात त्यांनी स्थानिक परिस्थिती समजून घेत उमेदवार घोषित केला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *