लाचेच्या चक्करमध्ये सरपंच, उपसरपंचावर निलंबनाची कारवाई
Suspension action against Sarpanch, Deputy Sarpanch in bribery case

बांधकाम साहित्याच्या बिलाची रक्कम काढून देण्यासाठी लाचेची मागणी करणे गोंदिया जिल्ह्याच्या वडेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच व दोन ग्रामपंचायत सदस्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.
या प्रकरणी अपर आयुक्तांनी (नागपूर) चौघांनाही पुढील आदेशापर्यंत निलंबित केल्याने ग्रामपंचायत क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सरपंच रीना हेमंत तरोणे, उपसरपंच दिनेश सुनील मुनेश्वर,
ग्रामपंचायत सदस्य मार्तंड मन्साराम मेंढे व लोपा विजय गजभिये अशी लाचखोरीच्या आरोपात निलंबित करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावे आहेत.
गोंदिया जिल्हाच्या सडक-अर्जुनी पंचायत समितीअंतर्गत ग्रामपंचायत वडेगाव येथे ग्रामपंचायतअंतर्गत विविध बांधकाम करण्यासाठी बांधकाम साहित्य पुरवठाधारकांची निविदा मंजूर करण्यात आली होती.
ग्रामपंचायत निविदेनुसार रूपचंद मेंढे ते माणिक हत्तीमारे यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण, मातामाय मंदिर ते घोडीपर्यंत रस्ता खडीकरण व अंगणवाडी क्रमांक एक व चार येथे
‘पेव्हर ब्लॉक’ बसविण्यासाठी बांधकाम साहित्य पुरवठादारांनी पुरवठा केलेल्या बांधकाम साहित्याचे मंजूर बिलाचे 15 लाख 55 हजार 696 रुपये घ्यायचे होते.
बिलाच्या रकमेचा चेक देण्यासाठी 5 टक्के प्रमाणे 75 हजार रुपयांची मागणी सरपंच रीना तरोणे, उपसरपंच दिनेश मुनेश्वर यांनी पुरवठादाराकडे केली होती.
पुरवठादाराला मागितलेली रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्यामुळे त्यांनी 26 जुलै 2023 रोजी गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन शासकीय पंचाकडून पडताळणी केली. त्यावेळी सरपंच व उपसरपंचांनी पंचांसमक्ष तडजोडीअंती 70 हजार रुपयांची मागणी केली.
यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून 19 ऑगस्ट 2023 रोजी गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली. पोलिसांनी प्रकरण न्यायालयात दाखल केले.







