शिवसेनेसोबत युतीबाबत राज ठाकरेंची मनसे नेत्यांना सक्त ताकीद
Raj Thackeray's stern warning to MNS leaders regarding alliance with Shiv Sena

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना सोबत येण्यासाठी साद घातली. उद्धव यांनी अवघ्या काही तासांत सकारात्मक विधान करत त्यांना प्रतिसाद दिला.
त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या. राज्यभरात अनेक ठिकाणी उद्धवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनर लावले.
दुसरीकडे राज यांच्या पक्षातील काही नेत्यांचा सूर युतीच्या विरोधात आहे. तशी विधानं त्यांनी गेल्या दोन दिवसांत केल्या आहेत. यानंतर आता राज यांनी मनसेच्या नेत्यांना सूचना केल्या आहेत. ते सध्या परदेश दौऱ्यावर आहेत.
शनिवारी केलेल्या विधानांमुळे दोन्ही ठाकरे चर्चेत आहेत. दोन बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर राज्यातील अनेक नेते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर राज यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना महत्त्वाची सूचना केली आहे. युतीच्या प्रश्नावर २९ तारखेपर्यंत काहीही बोलू नका, अशी सूचना राज ठाकरेंनी केली आहे. मनसेचे ज्येष्ठ पक्ष प्रकाश महाजन यांनी ही माहिती दिली.
राज ठाकरे सध्या परदेश दौऱ्यावर आहे. मनसे आणि शिवसेना उबाठा यांच्यातील युतीचा विषय संवेदनशील आहे. त्यामुळे २९ एप्रिलपर्यंत कोणीही या विषयावर बोलू नका, अशा सूचना राज ठाकरेंकडून पक्षातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
राज आणि उद्धव ठाकरेंच्या मनोमिलनाची चर्चा २ दिवसांपासून सुरु आहे. त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जाहीरपणे भूमिका मांडली आहे. तर यशवंत किल्लेदार आणि अमेय खोपकर यांनी केलेल्या सोशल मिडिया पोस्ट लक्षवेधी ठरल्या आहे. अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना, अशी पोस्ट अमेय खोपकरांनी एक्सवर केली होती.
महाराष्ट्र हिताच्या आड येणाऱ्यांचा पाहुणचार मी करणार नाही. त्यांना मी घरी बोलावणार नाही. त्यांच्या सोबत पंगतीला बसणार नाही, अशी शपथ घ्या, अशी अट उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी राज यांच्यासमोर ठेवली.
एका कार्यक्रमात बोलताना उद्धव यांनी ही अट ठेवली. अर्थात त्यांनी राज यांचं नाव न घेणं टाळलं. पण त्यांनी मांडलेली भूमिका राज यांना उद्देशूनच होती.
राज यांच्यासमोर अप्रत्यक्षपणे अट ठेवणाऱ्या उद्धव यांना मनसेकडून लगेचच प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या भेटीगाठींची आठवण करुन दिली.
ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचं स्मरणही त्यांनी करुन दिलं. याबद्दल उद्धव ठाकरे माफी मागणार का, असा प्रश्नही त्यांनी विचारला.