हवामान विभागाचा मोठा इशारा ;पुढचे 48 तास धोक्याचे
Big warning from the Meteorological Department; The next 48 hours are dangerous

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरूच आहे, अवकाळी पावसाचा मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून कोकणामध्ये उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट असणार आहे.
राज्यात 22 मे पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे, मात्र त्यानंतर पावसाला ब्रेक लागू शकतो अशी माहितीही हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
हवामान विभागाकडून सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर आणि रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे या भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आजही राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 20 मे रोजी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 21 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा,
मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून मूसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 20 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, नांदेड, परभणी, जालना व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 21 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी, जालना व हिंगोली जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा,
मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व जालना जिल्हयात तर दिनांक 23 मे रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा,
मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 व 23 मे रोजी मराठवाडयातील इतर जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात 2 ते 4 अं.से. ने घट होण्याची तर किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 23 ते 29 मे 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
संदेश : प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस असलेल्या पिक, फळाची व भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, कसदार व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. हलक्या तसेच पाण्याचा निचरा न होणाऱ्या चिबड जमिनीवर कापूस पिकाची लागवड करू नये. कापूस पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची खोली 60 ते 100 सेंमी असावी. तूर पिकाच्या लागवडीसासठी मध्यम ते भारी (30 ते 45 सेंमी खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी.
चोपन व क्षारयुक्त जमिनीत तूर पिकाची लागवड करू नये. तुर पिकाच्या वाढीस जमिनीचा सामु 6.5 ते 7.5 योग्य असतो. आम्लयुक्त जमिनीत पिकाच्या मुळांवरील गाठींची योग्य वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात. मूग/उडीद पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी.
एकदम हलक्या प्रतिची मुरमाड जमिन या पिकास योग्य नाही. पाणी साठवूण ठेवणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भूईमूग पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भूईमूग पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते हलकी, भुसभुशीत,
सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेल्या जमिनीची निवड करावी. भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभरीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. मका पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, सुपीक, उत्तम निचऱ्याची जमिनीची निवड करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
मृग बहार केळी पिकाच्या लागवडीसाठी चाऱ्या तयार करून घ्याव्यात. केळी लागवडीसाठी काळी व कसदार, भुसभुशीत गाळाची, पोयटयाची, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. लागवडीसाठी क्षारयुक्त जमिनीची निवड करू नये.
नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. केळी बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे.
आंबा लागवडीसाठी मध्यम ते भारी प्रतीची पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. चोपन व चुनखडीयुक्त जमिनीत लागवड करू नये. जमिनीची खोली कमीतकमी 1.5 ते 2 मीटर असावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.
नविन लागवड केलेल्या आंबा बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. वेळेवर एप्रिल छाटणी केलेल्या द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व रोगनाशकाची फवारणी करावी. मुरमाड, अत्यंत हलक्या, डोंगर उताराच्या जमिनीत तसेच मध्यम खोल जमिनीत सिताफळ लागवड करावी.
भाजीपाला
खरीप हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत जमिन निवडावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. पशुधनाकडुन सकाळी 11 ते दूपारी 4 या दरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठयाच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणोठयावर न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चरण्यासाठी सोडावे.
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार व हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पाऊस झालेल्या ठिकाणी पावसाचे पाणी जनावरांच्या पिण्याच्या पाण्या मध्ये मिसळू देऊ नये. जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्यावे.