Sanjay Raut had called Amit Shah before being arrested by EDईडीकडून अटक होण्याआधी संजय राऊतांनी केला होता अमित शहांना फोन

Sanjay Raut had called Amit Shah before being arrested by ED

 

 

 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत एक खळबळजनक विधान केलं आहे. ईडीकडून अटक होण्याआधी एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता.

 

मी वरती बोलू का?, गृहमंत्री अमित शाह यांना बोलू का?, असं एकनाथ शिंदे मला फोन करुन म्हणाले. यावर काहीच गरज नाही. तुम्ही माझ्याबद्दल वरती बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही,

 

असं संजय राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाले, असा गौप्यस्फोट स्वत: संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना केला. संजय राऊतांचं आज नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन आहे. या पुस्तकात देखील संजय राऊतांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

 

ईडीकडून अटक होण्याआधी मला एकनाथ शिंदेंचाही फोन आला होता, असा दावा संजय राऊत यांनी केला. एकनाथ शिंदेंनी मला फोन करुन मी वरती बोलू का?, अमित शाह यांना सांगू का? असं विचारले.

 

यावर नको, काही गरज नाही, असं मी म्हणालो, असं संजय राऊत म्हणाले. तसेच तुम्ही वरती बोलल्यानंतरही मी तुमच्या पक्षात येणार नाही, असं संजय राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाले.

 

माझ्या अटकेआधी मी शहा यांना फोन केला होता, कारण ते गृहमंत्री होते. रात्री 11 वाजता अमित शाह यांना कॉल केला होता ते कामात होते. 4-5 मिनिटांनी त्यांचा कॉल आला.

 

अटकेआधी माझ्या निकटवर्तीयांना त्रास दिला जात होता , धमक्या दिल्या. मी म्हणालो माझ्या मित्रावर रेड पडत आहे.. हे तुमच्या मंजुरीने होतं आहे. जर मला अटक करायची आहे तर मी दिल्लीच्या घरी आहे ही नौटंकी बंद करा,

 

असं मी अमित शाह यांना म्हणालो. यावर मला काहीच माहिती नाही, असं अमित शाह म्हणाले. माझ्या कुटुंबाला त्रास का दिला जातोय?, असा सवाल संजय राऊतांनी अमित शाह यांना केल्याचा दावाही संजय राऊतांनी केला आहे.

 

अमित शाह यांच्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता आली हे मी 100 टक्के सांगतो. आमचे भाजपचे संबंध चांगले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यासोबत चांगले संबंध होते.

 

पण अमित शाह दिल्लीत सक्रिय झाले आणि भाजप आणि शिवसेना नात्यामध्ये कटुता निर्माण झाली. काही भाजप नेत्यांनी अमित शाह यांना सांगितलंसुद्धा तुम्ही असं करू नका..

 

अरुण जेटली अमित शाह यांना म्हणाले होते, की महाराष्ट्रात शिवसेनेसोबत चांगले संबंध आहेत, तुम्ही असं करु नका, असा दावाही संजय राऊतांनी यावेळी केला.

 

ईडीची नोटीस आल्याने अटकेच्या भीतीने ठाकरे गटाचा एक नेता कसा हतबल झाला होता, मातोश्रीत तो कसा रडला होता आणि त्यामुळे उद्धव ठाकरेही कसे हतबल झाले होते याचा प्रसंग या पुस्तकात लिहिण्यात आला आहे.

 

ईडीची प्रतिमा तपास यंत्रणेपेक्षा भाजपच चालवत असलेली दहशतवादी संघटना अशीच झाली होती. त्यामुळे अनेकांनी घाबरून भाजपमध्ये उड्या मारल्या होत्या.

 

रवींद्र वायकर हे शिवसेनेच्या निष्ठावान समजल्या जाणाऱ्या आमदारांपैकी एक होते. उद्धव ठाकरे यांच्या किचन कॅबिनेटचे ते एक सदस्य होते. त्यांचा मातोश्रीवर राबता असे.

 

एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह पक्ष सोडला तेव्हा ते शिंदेंसोबत गेले नाहीत. पण किरीट सोमय्यांनी अचानक वायकरांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. रायगडमधील जमिनीवर नऊ बंगले बांधल्याचा फेक नरेटिव्ह त्यांनी पसरवला.

 

हे बंगले ठाकरे कुटुंबाचे आहेत असे भासवले. खोटे गुन्हे नोंदवले. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत वायकरांचा तपास सुरू केला. याच गुन्ह्यांचा आधार घेत त्यात ईडीला घुसवण्यात आले, असं संजय राऊत यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.

 

वायकर यांना ईडी अटक करणार असा धुरळा सोमय्यांनी उडवताच वायकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची गाळण उडाली. वायकर आणि त्यांचे कुटुंब मातोश्रीवर येऊन रडले.

 

माझ्यात तुरुंगात जायचे बळ नाही आणि ईडीच्या दहशतवादाशी लढण्याचे धैर्यदेखील नाही, असं वायकर यांनी मातोश्रीत सांगितलं. मला अटॅक येऊन मी मरून जाईल, नाहीतर आत्महत्या करावी लागेल.

 

तुरुंगात मरण्यापेक्षा बाहेर मरेन, अशी निराशा आणि निर्वाणीची भाषा वायकरांनी सुरू केली. तेव्हा उद्धव ठाकरेही हतबल झाले होते. कालपर्यंत ज्यांना वाघ समजत होतो, ते प्रत्यक्षात शेळ्याच आहेत हे त्यांना पटले, असं राऊत यांनी पुस्तकात लिहिलं आहे.

 

 

अखेर वायकर हे शिवसेना सोडून शिंदे गटात गेले. त्या क्षणीच त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले. याचा अर्थ वायकरांवरील गुन्हे खोटे होते. त्यांनी पक्ष सोडावा म्हणू त्यांच्यावरील दबाव होता,

 

असं सांगतानाच प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील अशा अनेकांनी अटकेच्या भीतीने उड्या मारल्या. सरनाईक यांच्यावर ईडीने धाडसत्र सुरू केलेच होते, असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *