Coronavirus Update;राज्यात पुन्हा कोरोना ?आरोग्यमंत्री आबिटकर काय म्हणाले ?
Coronavirus Update; Corona again in the state? What did Health Minister Abitkar say?

राज्यात काही ठिकाणी कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने राज्यात लोकांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाबत भीतीची चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी कोरोनावर महत्त्वाची अपडेट दिली आहे.
कोरोनाला घाबरण्याचं अजिबात कारण नाही. राज्य शासन पूर्णपणे अलर्टवर असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.
आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी कोरोनाच्या साथीबाबत महत्त्वाची माहिती देत राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
“सध्या आपली सामूहिक रोगप्रतिकारशक्ती वाढलेली आहे. त्यामुळे आधीसारखा गंभीर धोका आता नाही. नागरिकांनी अनावश्यक भीती न बाळगता जागरूक राहावं,” असं आबिटकर यांनी सांगितलं.
राज्यात साथरोग नियंत्रणासाठी चाचण्या आणि संसर्ग मॅपिंग यांचं काम सुरू आहे. शासन सर्व आजारांवर त्वरित उपचार करण्यास आणि व्यवस्थापनासाठी सक्षम असल्याचं ते म्हणाले.
हॉंगकॉंगमध्ये वाढलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी काही SOP येण्याची शक्यता आहे. “सध्या केंद्राकडून कोणतीही नवीन सूचना आलेली नाही. मात्र, आल्या तर त्याचे तंतोतंत पालन करण्यात येईल,” असं आबिटकर यांनी सांगितलं.
“आजही आपल्याभोवती कोरोना रुग्ण असू शकतात. मात्र, त्यांचा संसर्ग गंभीर ठरण्याची शक्यता कमी आहे. फक्त कोमॉर्बिड रुग्णांनी (विविध आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी) विशेष काळजी घ्यावी,” असा सल्लाही त्यांनी दिला.