शरद पवार – राहुल गांधी यांची भेट ; काय चर्चा झाली?
Sharad Pawar - Rahul Gandhi meeting; What was discussed?

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय आता जवळपास अंतिम टप्प्यात आला असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महत्त्वपूर्ण चर्चा केली आहे.
गेल्या मंगळवारी इंडिया आघाडीच्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा प्रश्न प्रामुख्याने चर्चेत होता.
मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रमुख आहे. महाराष्ट्रात असलेल्या ४८ जागांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षात प्रामुख्याने
जागावाटपाची स्थानिक पातळीवर चर्चा झाली आहे. आज शरद पवार व राहुल गांधी यांची भेट झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
‘जंतरमंतर’वर ‘इंडिया’ आघाडीच्या घटकपक्षांचे निदर्शने झाल्यानंतर शरद पवार व राहुल गांधी दोघेही एकाच गाडीत बसून थेट शरद पवार यांच्या ६, जनपथ या निवासस्थानी गेले. तेथे या दोन नेत्यांमध्ये जवळपास २० मिनिटे चर्चा झाली.
जवळपास १० ते १२ जागांबाबत अद्यापही महाविकास आघाडीत एकमत झालेले नाही. यात हातकणंगले, कोल्हापूर या प्रमुख मतदारसंघांचा समावेश आहे. हा तिढा दिल्लीतून सोडविण्याचे ठरले होते. या जागांच्या वाटपाबाबत यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांसोबत समन्वय साधण्याची भूमिका शरद पवार यांच्याकडे येण्याची शक्यता अधिक आहे.
या आघाडीतील मुख्यमंत्री नितीश कुमार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधून ‘इंडिया’ आघाडी अधिक मजबूत करण्यामध्ये शरद पवार अधिक महत्त्वपूर्ण व विश्वासार्ह भूमिका बजावू शकतील. या संदर्भात सुद्धा दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.