कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात विद्यापीठाचे उल्लेखनीय कार्य
Remarkable work of the university under the leadership of Vice Chancellor Dr. Indra Mani

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू म्हणुन डॉ इन्द्र मणि यांनी २५ जुलै २०२३ रोजी पदाची सुत्रे स्वीकारली, यास तीन वर्ष पुर्ण होत आहेत. देश व राज्याच्या विकासातील शेती व शेतकरी हेच आधारस्तंभ असुन विद्यापीठाने ‘शेतकरी देवो भव:’ भावनेने कार्य करण्याचा संकल्प त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात व्यक्त केला.
कृषि संशोधन व शिक्षण क्षेत्रात देशातील अग्रगण्य संस्था नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेत त्यांनी ३० वर्षापेक्षा जास्त काळ सेवा केली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील गाढा अनुभव त्यांना आहे. परभणी विद्यापीठासमोर अनेक समस्या समोर असतांना उपलब्ध मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीचा कार्यक्षम वापर कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण या तिन्ही क्षेत्रात विद्यापीठाची घोडदौड सुरू आहे. गेल्या तीन वर्षातील महत्वपुर्ण बाबींचा थोडक्यात आढावा.
विद्यापीठास ‘ए ग्रेड’ मानांकनासह आयसीएआर द्वारा पाच वर्षांसाठी अधिस्वीकृती :
विद्यापीठास भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीद्वारा प्रतिष्ठेचे ‘ए ग्रेड’ मानांकनासह अधिस्वीकृती प्राप्त झाली. विद्यापीठास १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२८ या कालावधीसाठी अधिस्वीकृती प्रदान करण्यात आली असून या मूल्यांकनात विद्यापीठास उच्चांकी ‘३.२१’ गुण प्राप्त झाले. ही अधिस्वीकृती विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनातील सातत्य व विस्तार सेवांतील कार्यक्षमतेची अधिकृत पावती आहे. माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व प्रभावी मार्गदर्शनामुळे हे ‘अ’ श्रेणी मानांकनासह अधिस्वीकृती प्राप्त झाली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अमंलबजावणी : राज्यातील कृषि विद्यापीठ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० राबविण्यास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये सुरूवात झाली असुन सदर धोरण कृषि विद्यापीठात प्रभावीपणे राबविण्याकरिता माननीय कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पातळीवर कार्य चालु आहे.
विद्यापीठ बीजोत्पादन वाढ : विविध पिकांच्या विद्यापीठ विकसित वाणाच्या दर्जेदार बियाणास शेतकरी बांधवामध्ये मोठी मागणी आहे, यात सोयाबीन, तुर, ज्वारी आदीच्या वाणास शेतकरी बांधवाची विशेष पसंती लक्षात घेता बीजोत्पादन वाढ करणे आवश्यक होते. विद्यापीठातील मध्यवर्ती प्रक्षेत्र विभागाकडे स्थापनेपासुन मोठया प्रमाणावर जमिनीचे क्षेत्र उपलब्ध आहे. या क्षेत्रावर १९७२ ते २००१ दरम्यान बीजोत्पादन घेतले जात होते, परंतु गेल्या काही वर्षापासुन निधी व मनुष्यबळ अभावी यातील बहुतांश क्षेत्र लागवडीखाली आणण्यात अडचणी निर्माण झाल्या. गेल्या तीन वर्षात विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी विद्यापीठाचे बीजोत्पादन वाढ करण्याच्या उद्देश्याने मध्यवर्ती प्रक्षेत्र विकासाकडे विशेष लक्ष दिले. विद्यापीठाची इंचनइंच जमीन वापराखाली आणण्याचा मानस माननीय कुलगुरू यांनी व्यक्त केला आहे. पडित जमीन लागवडीखाली आणण्यातील प्रमुख अडसर ठरणा-या क्षेत्रावरील काटेरी झाडेझुडपे काढुण जमिनीची नागंरणी, मोगडणी, चा-या काढणे इत्यादी मशागतीचे कामे करण्यात आली.
देश-विदेशातील विविध नामांकित संस्थासोबत सामंजस्य करार : राष्ट्रीय व जागतिक स्तरावरील कृषि क्षेत्रातील संशोधन व ज्ञानाची माहिती विद्यापीठ शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांना अवगत असणे आवश्यक आहे. शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदु असुन शेती विकास व शेतकरी कल्याणाकरिता सर्व शासकीय व अशासकीय संस्थांनी एकत्रित कार्य करण्यावर माननीय कुलगुरू यांचा भर असुन त्यांच्या कार्यकाळात देश – विदेशातील संस्थासोबत आजपर्यंत ४० सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
डिजिटल शेती व ड्रोन तंत्रज्ञानाचा कृषि क्षेत्रात वापर : डिजिटल शेती संशोधनास प्रोत्साहनाकरिता विद्यापीठात जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्पाच्या माध्यमातुन कृषी ड्रोन, यंत्र मानव आणि स्वयंचलित तंत्रज्ञान विकासावर भर देण्यात येत आहे. येणा-या काळात ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीत फवारणी करिता आणि किड व रोगांचे निरीक्षण आदी करिता वापर वाढणार आहे. शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात करिता राष्ट्रीय पातळी कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पाच समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. या समित्यांनी विविध पिकांत किटकनाशके, अन्नद्रव्य व खते देण्याकरिता ड्रोनचा वापराबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित केले आहेत.
विद्यापीठास विविध संशोधन व प्रशिक्षण प्रकल्प : सीएनएच न्यु हांलड कंपनी द्वारा कोर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) निधीच्या माध्यमातुन १५०० तरूण शेतकरी बांधवांना आधुनिक कृषि अवजारे यांचा उपयोग, दुरूस्ती आणि देखरेख विषयोंवर प्रशिक्षीत करण्यात आले आहे. जे फार्म कंपनीच्या कोपॉरेट सामाजिक जबाबदारी निधीच्या माध्यमातुन महाराष्ट्र यात्रिकीकरण प्रशिक्षण केंद्राची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
नाविण्यपुर्ण संशोधन : कृषी क्षेत्रात अॅग्री फोटोव्होल्टेइक तंत्रज्ञानाच्या वापराकरिता वनामकृविचा जर्मनीच्या जीआयझेड सोबतचे संशोधन कार्य प्रगतीपथावर आहे. अॅग्रीपीव्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन सौर ऊर्जेतुन वीज निर्मितीसोबत विविध पिकांची लागवड केल्यास शेतकरी बांधवाना दुहेरी उत्पन्न मिळण्याचे साधन प्राप्त होऊ शकते. हे तंत्रज्ञान भारताकरिता नवीन असुन या तंत्रज्ञानाची मराठवाडयातील पिक पध्दतीत कितपत उपयुक्त ठरू शकते, याकरिता संशोधनात परभणी कृषि विद्यापीठाने राज्यात पुढाकार घेतला आहे.
नवीन वाण निर्मिती : विद्यापीठ विकसित वाण व तंत्रज्ञान केवळ मराठवाडा किंवा राज्यापुरते उपयुक्त नसुन देशातील अनेक राज्यातील शेतकरी बांधवाकरीता उपयुक्त आहे. केंद्रीय बियाणे अधिनियम, १९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्या शिफारसीनुसार २०२३ मध्ये वनामकृवि विकसित करडई पिकांच्या पीबीएनएस १८४, देशी कापसाच्या पीए ८३७, खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती, तुरीचा वाण बीडीएन-२०१३-२ (रेणुका), सोयाबीनचे एमएयुएस-७२५ आणि करडई पिकाचे पीबीएनएस-१५४ (परभणी सुवर्णा) या वाणांचा समावेश केला आहे. यामुळे या वाणांचा प्रचार व प्रसार मोठया प्रमाणावर होण्यास मदत होणार आहे. २०२४ मध्ये राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठात आयोजित संयुक्त कृषि संशोधन आणि विकास बैठकीत विद्यापीठ विकसित सहा वाण, ३ तीन कृषी औजारे सह ३६ विविध तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच २०२४ मध्ये अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात आयोजित संयुक्त कृषि संशोधन आणि विकास बैठकीत विद्यापीठ विकसित भेंडीचा परभणी सुपर क्रांती (पीबीएन ओकरा -१) आणि केळीचा वनामकृवि – एम ३ या नवीन वाणाची आणि पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित तसेच पोषण आहार, पशुविज्ञान आणि कृषि संलग्न इतर शाखेतील तंत्रज्ञानाच्या ४८ शिफारशींना मान्यता प्राप्त झाली आहे. विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राद्वारे विकसित करण्यात आलेला तुरीचा बीडिएनपीएच १८ – ५ या संकरित वाणास लागवडीकरिता मान्यता प्राप्त झाल असून या वाणाची शिफारस महाराष्ट्रासह भारताच्या मध्य विभागासाठी करण्यात आलेली आहे.
विद्यापीठ विकसित मनुष्य चलित रोपवाटीका भाजीपाला टोकन यंत्राची रोपवाटीके मध्ये मिरची, वांगे, टोमॅटो, कांदे, कोबी व कोथींबीर या पिकाची रोप तयार करण्यासाठी वापर करणासाठी प्रसारीत करण्यात आले तर विद्यापीठ विकसीत विविध धान्यापासून लाहया व खरमूरे बनविण्याच्या लघुउद्योगासाठी, एलपीजी चलित (उच्च तापमान कमी वेळ आधारीत), अर्धस्वयंचलित पफिंग व पॉपिंग संयंत्र प्रसारीत करण्यात आले.
कापुस पिकातील बीटी सरळ वाणास केंद्रीय वाण निवड समितीची मान्यता : विद्यापीठ विकसित तीन अमेरिकन बीटी सरळ वाण व देशी कपाशीच्या एका सरळ वाणाची केंद्रीय वाण निवड समितीद्वारे लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राद्वारे विनियंत्रीत बीटी (क्राय १ एसी जनुक) तंत्रज्ञानयुक्त वाणांची पैदास करण्याचे कार्य सुरू असुन याद्वारे निर्मीत एनएच १९०१ बीटी (NH 1901), एनएच १९०२ (NH 1902) बीटी व एनएच १९०४ (NH 1904) बीटी ही तीन अमेरीकन सरळ वाण अखिल भारतीय समन्वयित कापूस सुधार प्रकल्पाच्या केंद्रीय वाण निवड समितीने मध्य भारत (महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश) विभागाकरिता प्रसारीत करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. विद्यापीठांतर्गत परभणी स्थित कापूस संशोधन केंद्र, महेबूब बाग या केंद्राद्वारे निर्मीत देशी कापूस सरळ वाण पीए ८३३ (PA 833) हा वाण देखिल समितीद्वारे दक्षिण भारत विभागाकरिता (आंध्र प्रदेश, कर्नाटक व तामिळनाडू) प्रसारणासाठी शिफारस करण्यात आला आहे.
माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत उपक्रम : कृषि तंत्रज्ञान शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्याकरिता विद्यापीठाव्दारे विविध उपक्रम राबविण्यात येतातच, परंतु याची व्याप्ती व गती वाढविण्याकरिता प्रयत्न केला जात आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” उपक्रमातंर्गत मराठवाडा विभागातील विविध गावात राबविण्यात आला, यात विद्यापीठ शास्त्रज्ञाच्या पथकांनी गावांना भेटी देऊन शेतकरी बांधवांच्या शेती विषयक समस्या समजुन घेतल्या व पीक लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले,
ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद : विद्यापीठाच्या वतीने गेल्या दोन वर्षापासुन ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम दर मंगळवारी व शुक्रवारी सायंकाळी ७ ते ८.३० दरम्यान राबविण्यात येत आहे. यास मोठया प्रमाणात शेतकरी बांधवा सहभागी होऊन आपले प्रश्न विचारतात तर विद्यापीठ शास्त्रज्ञ त्याच्या समस्याचे समाधान यशस्वीरित्या करतात.
विकसित कृषी संकल्प अभियानाची ५८४ गावांमध्ये अंमलबजावणी : भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत विकसित कृषी संकल्प अभियान दिनांक २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान देशभरात राबविण्यात आला. महाराष्ट्रामध्ये या अभियानाचा उदघाटन राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परभणी येथे करण्यात आले. सदर उपक्रमाव्दारे विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने ५८४ गावांमध्ये राबविण्यात येऊन एक लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
चार शासन अनुदानित व दोन संशोधन केंद्रास मान्यता : महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने नवीन चार शासन अनुदानित घटक महाविद्यालये स्थापना करण्यास आली आहे. यात जिरेवाडी (परळी) येथे कृषि महाविद्यालय आणि कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नांदेड येथे कृषि महाविद्यालय तसेच सिल्लोड तालुक्यात कृषि महाविद्यालयास मान्यता प्राप्त झाली असुन गतवर्षी या महाविद्यालयात प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. धर्मापुरी (परळी) येथे सोयाबीन संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्र आणि सिल्लोड येथे मका संशोधन केंद्रास मान्यता मिळाली आहे.
कृषि उद्योजकता विकासावर भर : अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयात नवी दिल्ली येथील केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत सामाईक उष्मायन केंद्र (कॉमन इन्क्युबेशन सेंटर) सुरवात करण्यात आली असुन यामुळे अन्न प्रक्रिया उद्योजक शेतकरी बांधवा लाभ होणार आहे. कौशल्य विकास उपक्रमांतर्गत ग्रामीण युवकांना तसेच पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कृषी उद्योजकतेचे घडे दिले जात आहे.
सन्मान व पुरस्कार : प्रगतशील शेतकरी, नन्मोषक कृषी उद्योजक, विद्यापीठ शास्त्रज्ञ यांचा सन्मान – विद्यापीठाच्या वतीने आयोजित विविध पातळीवर शेतकरी, कृषि उद्योजक, कृषि शास्त्रज्ञ यांना सन्माननीत करण्यात येऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. कोणताही मेळावा व कार्यशाळा असो शेतकरी बांधव व महिला प्रतिनिधीस सन्मानाने व्यासपीठावर स्थान दिले पाहिजे, असा आग्रह माननीय कुलगुरू यांचा असतो. नुकतेच मोदीपुरम (मीरत, उत्तर प्रदेश) येथे भारतीय शेती संशोधन संस्थेमध्ये आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय एकात्मिक शेती पद्धती परिषदेत परभणी येथून माननीय कुलगुरू सोबत प्रगतशील शेतकरी, विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसह १५ जणांचा चमू सहभागी झाले होते. तसेच इंदोर येथे संपन्न झालेल्या माननीय केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेत आपल्या भागातील शेतकरी बांधव सहभागी होऊन आपले अनुभव कथन केले.
विद्यापीठास तीन आंतरराष्ट्रीय आयएसओ मानांकने : वनामकृविस आयएसओ ५०००१, आयएसओ १४००१, आयएसओ २१००१ ही मानके प्राप्त झाली असुन यामुळे विद्यापीठाची राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष ओळख प्राप्त होणार आहे. आयएसओ ५०००१ हे मानक विद्यापीठातील ऊर्जा विनिमय आणि व्यवस्थापन दर्जेाच्या आधारे विद्यापीठास प्राप्त झाले आहे.
हरित विद्यापीठ – वृक्ष लागवडीची विशेष मोहिम व विद्यापीठास हरित विद्यापीठ पुरस्कार २०२३ : विद्यापीठ परिक्षेत्रावर २०० एकर वर नवीन फळबागे लागवडीचे कार्य चालु असुन यात फळपिकांच्या विविध जातीची लागवड करण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठ परिसरात एक लक्ष वृक्षलागवडीस सुरूवात करण्यात आले आहे. गेल्या वर्षी पासुन वन विभागाच्या माध्यमातुन विद्यापीठातील रेल्वे लाईनच्या लगत ४.५ किलोमीटर फळपिके व वनपिकांची लागवड करण्यात आली आहे.
कृषि विद्यापीठास ग्रीन मेंटर्स संस्थेचा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्कार २०२३ न्युयॉर्क येथे आयोजित ७ व्या एनवायसी ग्रीन स्कुल कॉन्फरन्समध्ये ७८ व्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशना प्रदान करण्यात आला.
माननीय कुलगुरू यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले : अमेरिकेतील फ्लोरिड विद्यापीठात मुख्यालय स्थित असलेल्या कृषी आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय अकादमी या अग्रगण्य वैज्ञानिक संस्थेचे फेलो म्हणुन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांची निवड झाली, जपान मधील क्योटो येथे आयोजित विसावी सीआयजीआर जागतिक परिषदेत त्यांना फेलो म्हणु अकादमीच्या वतीने सन्माननित करण्यात आले,
विविध संशोधन केंद्रास पुरस्कार : विद्यापीठांतर्गत असलेल्या लातुर येथील गळीतधान्ये संशोधन केंद्राच्या अखिल भारतीय समन्वीत संशोधन (सूर्यफुल) प्रकल्प, करडई संशोधन केद्र, छत्रपती संभाजीनगर येथील बाजरा संशोधन प्रकल्पास उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार, बदनापुर येथील तुर संशोधन केंद्राला सर्वोत्कृष्ट मानांकन मिळाले आहे. नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रास अखिल भारतीय समन्वयीत कापूस संशोधन प्रकल्पातर्फे राष्ट्रीय पातळीवरील ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र’ या बहुमानाने गौरविण्यात आले असुन सेंद्रीय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास जैविक इंडिया पुरस्कार प्राप्त झाला आहे.
महत्वाचे कार्यक्रम व कार्यशाळेेेचे यशस्वी आयोजन : विद्यापीठाचा २५ वा व २६ वा दीक्षांत समारंभाचे यशस्वी आयोजन करण्यात आले, यात स्नातकांना विविध पदवीने माननीय राज्यपालांच्या हस्ते अनुग्रहित करण्यात आले. विद्यापीठ आणि परभणी आत्मा, कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्ली पुरस्कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे भव्य आयोजन करण्यात आले. यात देशातील सात राज्यातील कृषि तंत्रज्ञान पाहण्याची संधी शेतकरी बांधवाना मिळाली. छत्रपती संभाजी नगर येथे बारावी राष्ट्रीय बियाणे परिषदेचे विद्यापीठाने यशस्वी आयोजन केले, यात देशातील बियाणे पैदासकार, तज्ञ, शेतकरी व धोरणकर्ते यांनी सहभाग नोंदविला. तसेच कृषि संशोधनाची दिशा ठरविण्याकरिता केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा कार्यशाळा घेण्यात आली, यातही देश पातळीवरील तज्ञांनी सहभाग नोदंविला. खरीप व रब्बी हंगामातील परिस्थितीनुसार वेळोवेळी कार्यशाळा घेण्यात आल्या, यात मराठवाडयातील कृषि विभागातील अधिकारी, विस्तार कार्यकर्ते, शासन व शेतकरी सहभागी झाले. परिस्थितीनुसार शेतीत करावयाच्या उपाय योजना शेतकरी बांधवापर्यंत पोहविण्याकरिता प्रयत्न करण्यात आला. ५३ व्या संयुक्त कृषि संशोधन विकास समितीच्या बैठकीचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले, या बैठकीचे उदघाटन माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यात राज्यातील ३०० पेक्षा जास्त कृषि शास्त्रज्ञ, व धोरणकर्ते सहभागी झाले होते. विद्यापीठामध्ये प्रथमच तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद आणि भारतीय कृषि अभियंता संघटनेच्या ५८ व्या वार्षिक अधिवेशनाची यशस्वी आयोजन करण्यात आले होते, यात देश-विदेशातील ७५० मान्यवर प्रतिनिधींचा सहभाग नोदविला होता.
विद्यार्थ्यांचे कला क्षेत्रातील यश : विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्याकरिता वेळोवेळी सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. बंगलोर येथील जैन विद्यापीठात ३६ वा आंतर विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव – जैन उत्सव २०२३ स्पर्धेत मेंदी कला प्रकारात विद्यापीठांतील लातुर येथील कृषि महाविद्यालयाची विद्यार्थींनी सिध्दी देसाई हिने कांस्य पदक पटकावले. तर आयसीएआर अॅग्री युनेफेस्ट मध्ये फाईन ऑर्ट मध्ये चॅपियन ट्रॉफी प्राप्त केली. एकविसाव्या अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ स्पर्धेत व्हॉलीबॉल मध्ये विद्यापीठ संघाने सुवर्ण पदक प्राप्त केले.
मुलभुत सोयी सुविधांचे बळकटीकरण : महाराष्ट्र शासनाने विद्यापीठातील अंतर्गत रस्ते मजबुतीकरणास आणि डांबरीकरणास करण्यात आले. विद्यापीठातील गेस्ट हाऊस सुविधा, विद्यार्थी व विद्यार्थीनीनीं वसतीगृहाच्या चांगल्या सुविधा पुरविण्याकरिता माननीय कुलगुरू नेहमीच आग्रही असतात, विद्यापीठातील सभागृह, वसतीगृहांचे नुतनीकरणाचे काम करण्यात आले असुन गोळेगांव, लातुर, बदनापुर येथील वसतीगृहाचे नुतनीकरण केले गेले आहे.
निवृत्त कर्मचारी यांच्या वेतनातील थकबाकीचा प्रश्न सोडविण्यात आला असुन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या पदोन्नत्या देण्यात आला आहे. संशोधन क्षेत्रात शेतकरी बांधवाकरिता उपयुक्त संशोधन करणे हा प्रमुख उद्देश्य विद्यापीठाचा असुन बदलत्या हवामानानुसार संशोधनास गती देण्याचे कार्य सुरू आहे. सद्यस्थितीत विद्यापीठात मनुष्यबळांचा विचार करता पन्नास टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त असतांना विद्यापीठाचा दर्जा राष्ट्रीय पातळीवर उंचावण्याचे मोठे आव्हान विद्यापीठा समोर आहे.
विद्यापीठाचे नामांकन उच्चांवण्याकरिता दर्जेदार संशोधनाची आवश्यकता असुन याकरिता देश पातळीवरील विविध संस्थेकडुन तसेच महाराष्ट्र शासनाकडुन निधी प्राप्त करण्याकरिता प्रयत्न चालुच आहेत. माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात विद्यापीठ शेतकरी केंद्रीत विस्तार कार्य, विद्याथी केंद्रीत शिक्षण, नवाचार केंद्रीत संशोधन आणि कर्मचारी केंद्रीत प्रशासन हा दृष्टीकोन ठेऊन कार्य करत आहे. येणा-या काळात माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात परभणी कृषि विद्यापीठात आमुलाग्र बदल होऊन देशातील एक अग्रगण्य कृषि विद्यापीठ म्हणुन नावारूपाला येईल, हे निश्चित








