16 वर्षांनंतर भारतात मान्सून वेळेपूर्वीच , हवामान विभागाकडून महत्वाची माहिती
After 16 years, monsoon arrives ahead of schedule in India, important information from the Meteorological Department

गेल्या काही दिवसांपासून घामाघामू झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. यंदा मान्सून लवकर दाखल होणार आहे. केरळमध्ये नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच मान्सून दाखल होत आहे.
तसेच यंदा पाऊस चांगला बरसणार आहे. मान्सून नियोजित तारखेच्या चार दिवस आधी २७ मे रोजी केरळामध्ये येणार आहे. हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
केरळमध्ये मान्सून १ जून दाखल होत असतो. परंतु आयएमडीच्या अंदाजानुसार, यंदा मान्सून २३ मे ते ३१ मेदरम्यान कधीही येऊ शकतो. अंदमान निकोबारमध्ये गेल्या वर्षी १९ मे रोजी मान्सून दाखल झाला होता.
त्यानंतर केरळात ३० मे रोजी आला होता. परंतु यंदा त्याच्या आधी २७ मे रोजीच येणार आहे. यंदा अल निनो आणि ला निना याबाबत कोणतीही परिस्थिती उद्भवणार नाही. त्यामुळे १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे.
मान्सून केरळमध्ये १६ वर्षांनंतर लवकर येत आहे. २००९ मध्ये २३ मे रोजीच मान्सून आला होता. २०२४ मध्ये ३० मे रोजी तर २०२३ मध्ये ८ जून रोजी मान्सून केरळमध्ये आला होता.
२०२२ मध्ये २९ मे, २०२१ मध्ये ३ जून, २०२० मध्ये १ जून, २०१९ मध्ये ८ जून आणि २०१८ मध्ये २९ मे रोजी मान्सून केरळमध्ये आला होता.
यंदा २७ मे रोजी केरळमध्ये येणारा मान्सून संपूर्ण देशांत ८ जुलैपर्यंत पोहचणार आहे. १५ ऑक्टोबरपासून मान्सूनची माघार सुरु होणार आहे.
यंदा पाऊस सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त होणार आहे, असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम.रविचंद्रन यांनी सांगितले. गेल्या वर्षीही सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता.
त्यानुसार सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. २०१५ वगळता गेल्या २० वर्षांतील आयएमडीचे भाकित खरे ठरले. यंदा मान्सून लवकर येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना लवकर कामाला लागावे लागणार आहे.
यंदा देशात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत १०५ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
तसेच राज्यातही सर्वदूर चांगला पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाने राज्यात पुढील तीन-चार दिवस वादळी पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पश्चिम मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सापाटीपासून १.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून उत्तर महाराष्ट्र,
कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उष्ण आणि धुरकट हवामानानंतर आलेल्या अचानक पावसामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.
समीर अॅपवर शनिवारी मुंबईच्या हवा गुणवत्तेची श्रेणी चांगली नोंदली गेली. शनिवारी मुंबईचा एकूण हवा निर्देशांक ५६ इतका म्हणजेच चांगल्या श्रेणीत नोंदला गेला.
मागील काही दिवसांपासून मुंबईची हवा गुणवत्ता प्रामुख्याने मध्यम श्रेणीत नोंदली जात होती. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून मुंबईत पडलेल्या पावसामुळे
हवेतील प्रदूषण कमी झाले आहे. धूळ आणि सूक्ष्म कण खाली बसले आहे. हवेतील ओलसरपणा वाढल्याने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
समीर अॅपच्या नोंदीनुसार, शनिवारी भायखळा येथील हवा निर्देशांक ३७, माझगाव ५८, कुलाबा ६१, शिवडी ४३, मुलुंड १४, बोरिवली ३६, चेंबूर ३८, घाटकोपर ३०, कांदिवली ३३, अंधेरी ६२ आणि वांद्रे येथे ६३ इतका होता.