भारतातील पहिले AI गाव,महाराष्ट्रात
India's first AI village in Maharashtra

भारतातील पहिले AI गाव महाराष्ट्रात उभारण्यात आले आहे. नागपुरातील सातनवरी या देशातील पहिल्या स्मार्ट आणि इंटलीजन्ट(प्रायोगिक तत्त्वावर) गावाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून शेती,
आरोग्य, शिक्षण आदी महत्वाच्या सुविधा सातनवरी गावात उपलब्ध करून देत समृद्ध गावाचे रोल मॉडेल उभे राहिले असून लवकरच राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील 10 गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. याद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास 3 हजार 500 गावे स्मार्ट व इंटेलिजंट करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत कार्यरत व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेसने (व्हाईस) देशांतर्गत 24 कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येत राज्य शासन व नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सातनवरी गावात आधुनिक तंत्रज्ञान आधारित सेवा उपलब्ध करून देत या गावाला देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव बनविले आहे. प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आलेल्या या स्मार्ट व इंटेलिजंट गावाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.
तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून गावात सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सातनवरी गावात सुरू झालेला देशातील स्मार्ट व इंटेलिजंट गावाचा शुभारंभ हे एक क्रांतीकारक पाऊल असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी आपल्या संबोधनात म्हणाले. गावांना सक्षम करण्याच्या दिशेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून देशातील गावागावांमध्ये भारतनेट प्रकल्प राबविला गेला.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे यशस्वी अंमलबजावणी राज्यात झाली व दुसऱ्या टप्प्याची सुरूवातही झाली. याच धरतीवर महाराष्ट्रात महानेट हा प्रकल्प राबविण्यात आला. आता याच प्रवासात भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकत गावांमध्ये आरोग्य,
शिक्षणासोबतच स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे किटकनाशके व खत फवारणी, बँक ऑन व्हिल, स्मार्ट टेहळणी अशा एकूण 18 सेवा कमी वेळात उपलब्ध करून देत सातनवरी हे देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव ठरले आहे.
या गावातील शेतकरी ड्रोन व सेंसर आदींचा उपयोग करून माती परिक्षण, फवारणी, खते आदींचे योग्य नियोजन करून शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवू शकतील. गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारल्याने गावकऱ्यांचे आरोग्य सुधारेल.
टेलिमेडिसिन आदींचा उपयोग होवून गावातच आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध होणार आहे. गावात प्राथमिक शिक्षणात कृत्रिम बुद्धीमत्ता व स्मार्ट शिक्षणाचा उपयोग होवून वैश्विक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल व सातनवरी गाव लवकरच देशात एक रोल मॉडेल म्हणून नावारूपाला येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
तसेच या सेवांचा योग्य प्रकारे वापर करत येत्या वर्षात सातनवरी गावाने देशातील सर्वात प्रगतीशील गाव म्हणून नावलौकीक मिळावावे, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या.
सातनवरी गावाने अल्पावधीतच स्मार्ट व इंटेलिजंट गाव बनण्याचा बहूमान मिळवला असून लवकरच राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक तालुक्यात 10 गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास 3 हजार 500 गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया आदी महत्वाचे प्रकल्प देशात राबविले. यालाच पुढे घेवून जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात स्मार्ट व इंटेलिजंट गाव तयार करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला व नागपूर जिल्ह्याला हा मान मिळाला ही अभिमानाची बाब आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजनमधून 1200 कोटींचा भरीव निधी मंजूर केला व यामाध्यमातून जिल्ह्यात विविध विकास कामे सुरू असून सातनवरी गावाच्या माध्यमातून देशात विकसित ग्रामीण भागासाठी डिजिटल गावाची सुरूवात झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.








