19 ते 25 मेदरम्यान पावसाचा जोर वाढणार ;वीज व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस
Rainfall will increase between May 19 and 25; heavy rain with lightning and thunder

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी (17 मे) मुंबईसह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळला.
या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून, काही ठिकाणी वीज कोसळून जीवितहानी झाल्याच्याही घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात राज्यात आणखी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 22 मे रोजी कर्नाटक जवळ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून, त्यामुळे महाराष्ट्रात 19 ते 25 मेदरम्यान पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, 17 ते 20 मेदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाचे संकेत मिळत आहेत.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, गुजरात आणि उत्तर कोकण किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे सक्रिय झाले असून, याचा परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघर भागात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गडगडाटासह पाऊसही कोसळू शकतो. शनिवारी वांद्रे, अंधेरी, बोरिवली, खार आणि गोरेगावसारख्या भागात हलक्या ते मध्यम सरी बरसल्या.
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 17 ते 19 मेदरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका असण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातही वीज व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अकोला जिल्हा प्रशासनाने नागरिकांना हवामानाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, जनावरे झाडांखाली किंवा विजेच्या तारेजवळ बांधू नका.
पावसात किंवा विजेच्या गडगडाटाच्या वेळी मोबाईलचा वापर टाळावा, आणि शक्यतो सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 16 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, लातूर, बीड व परभणी जिल्हयात तर दिनांक 17 मे रोजी धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी जिल्हयात तर दिनांक 18 मे रोजी धाराशिव, लातूर, बीड व जालना जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी धाराशिव, लातूर, बीड व परभणी जिल्हयात तर दिनांक 20 मे रोजी धाराशिव, लातूर, बीड, नांदेड व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात पुढील चार दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 2 ते 4 अं.से. ने घट होण्याची तर पुढील चार दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 2 ते 4 अं. से. ने घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 16 ते 22 मे 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी व दिनांक 23 ते 29 मे 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
संदेश : प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार मराठवाडयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस असलेल्या पिक, फळाची व भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण नियंत्रण करावे. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावीत, पिवळ्या चिकट सापळ्यांचा पिकात वापर करावा, रासायनिक कीटकनाशकामध्ये व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75% 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे ही कामे सुरु असून पावसाचा अंदाज पाहता हळदीची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या उन्हाळी तीळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे सध्या आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी व बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत फळगळ कमी होण्यासाठी व फळवाढीसाठी 00.00.50 @ 1.5 किलो व जिब्रॅलिक ॲसिड 15 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत फुलोरा धरण्यासाठी 00:52:34 1.5 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे. काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. आंबा बागेत पाण्याचा ताण बसल्यामूळे फळगळ होऊ शकते, फळगळ होऊ नये म्हणून आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. घड लागलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.
केळी बागेस आवश्यकतेनूसार सरी वरंब्याने पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या केळीच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. लहान फळ झाडांना काठीने आधार द्यावा. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी लवकरात लवकर करावी. उन्हाळी भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करावी.
तुती रेशीम उद्योग
उन्हाळ्यात तुती रेशीम किटक संगोपन करणारे शेतकरी मराठवाडा विभागात फार तूरळक असून त्यांनी तुती बागेला 7-8 दिवसाच्या अंतराने हलक्या जमिनीत तर भारी जमिनीत 10-12 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. ठिबक सिंचन द्वारे पाणी दिले तर 43 लक्ष लिटर प्रति एकर प्रती वर्ष या प्रमाणे दिवसाला ठिबक संच 5 तास चालेल या प्रमाणे पाणी द्यावे. रेशीम किटक संगोपन चालू असणाऱ्या शेतकऱ्यांनी 4 दिवस अगोदर बागेस पाणी द्यावे. ज्या शेतकऱ्यांकडे पानी नसेल अशा शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात 2 महिने किटक संगोपन होवू नये. जमिनीला विश्रांती मिळेल, अंतर मशागतीची कामे करून घ्यावी. संगोपनगृहाचे बक्करी करण करून घ्यावे.
पशुधन व्यवस्थापन
कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे, जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. पशुधनाकडून सकाळी 11 ते दूपारी 4 यादरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणोठ्यावर न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पाऊस झालेल्या ठिकाणी पावसाचे पाणी जनावरांच्या पिण्याच्या पाण्या मध्ये मिसळू देऊ नये. जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्यावे.