संजय राऊतांना अटक करण्याची मागणी
Demand for arrest of Sanjay Raut

काही महिन्यांपासून खासदार संजय राऊत हे वारंवार न्यायालयाचा अवमान करत आहेत. ते न्यायालयाचा कोणताही निर्णय मानत नाहीत. न्यायालयाचा वारंवार अपमान करत राहायचे,
याबाबत मी स्वतः न्यायालयाला विनंती करतो की, राऊतांवर सुमोटो कारवाई करून लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली.
पत्रकार परिषदेत राणे म्हणाले की, काल सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहाबद्दल महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या समुहामुळे देशातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या उद्योगांमुळेच आपला देश प्रगतीपथावर आहे. मेक इन इंडिया हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे.
या संकल्पपूर्तीला आधार देणारे अदानी सारखे काही महत्त्वाचे उद्योजक आहेत. त्या महत्त्वाच्या उद्योजकांना हिंडनबर्गच्या नावाने
आणि पर्यायाने देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. न्यायालयाकडून तो काल हाणून पाडण्यात आला असल्याचे राणे म्हणाले.
न्यायालयाच्या निर्णयाची मिर्ची लागल्याने संजय राऊत यांनी अदानी समूहाबद्दल गरळ ओकली आहे. तसेच आजचा सामनाचा अग्रलेख ही त्यावर आहे.
एका बाजूला मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि शरद पवार यांचा चेला आहे, असे संजय राऊत म्हणतात. मग त्यांनी अदानी समूहाबद्दल शरद पवार यांचे काय मत आहे हे समजून घ्यावे, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.