अजित पवार गटातील आमदाराचा पुतण्या ठाकरे गटात दाखल
Nephew of MLA from Ajit Pawar group joins Thackeray group

ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा गटाला मोठा झटका बसला आहे. अजितदादा गटाचे आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित शैलेश यांनी हातात शिवबंधन बांधले आहे. अजितदादा यांना त्यांच्या होमपीचवरच मोठा झटका बसल्याने पुण्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच अजितदादा यांना बसलेल्या धक्क्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी शैलेश मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खेड आणि राजगुरूनगरमध्ये धक्का बसला आहे.
आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे शैलेश मोहिते पाटील यांना ठाकरेंनी शिवबंधनात बांधून घेतलं आहे. तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला.
यापूर्वी पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरेंनाही उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे खेचलं होतं.
मावळ लोकसभेत वाघरेंच्या रूपाने तर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहितेंच्या रूपाने ठाकरेंनी अजित पवारांना धक्के दिले आहेत.
शैलेश मोहिते पाटील हे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे आहेत. शैलेश हे राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस आहेत.
राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सरचिटणीसही आहेत. तसेच राष्ट्रवादीचे ते उत्तराखंड,
झारखंड, छत्तीसगड, लक्षद्वीपचे निरीक्षक होते. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाचं बळ वाढलं आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी लोकसा आणि विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलंय. आमच्यासाठी राज्यात फक्त मावळ लोकसभाच नाहीतर सर्वच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महत्त्वाच्या आहेत.
कारण आज राज्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. राज्यातील सर्व उद्योगधंदे राज्य बाहेर पाठवले जात आहेत. आमच्या तोंडाचे घास देखील पळवला जात आहे.
उद्योग क्षेत्र, कृषी क्षेत्र कोलमडलं आहे. मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी प्रत्येक सीटवर जिंकून येणं हे खूप महत्त्वाचं आहे.
महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करण्यासाठी प्रत्येक उमेदवार जिद्दीन आणि ताकदीने जिंकणं गरजेचं आहे, आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
यावेळी त्यांनी उद्योग मंत्र्यांवरही टीका केली. त्यांना त्यांच्या खात्याबद्दल किती जास्त माहीत आहे. हे मला माहित नाही. कारण मागच्या वेळेस जेव्हा वेदांत फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस इथून जेव्हा निघून गेले,
हे त्यांना माहितीच नव्हतं म्हणून मला त्यांच्यावर जास्त टीका करायची नाही.
ज्यांना माहीत नाही त्यांच्यावर टीका करून काय अर्थ? आधी त्यांनी स्वतःच्या खात्याची ओळख करून घ्यायला हवी, अशी टीका त्यांनी केली.