500 रुपयाची लाच प्रकरणात लिपिकासह तिघांना अटक

500 rupees bribe case arrested three people including a clerk

 

 

 

 

जनरल मुख्तारपत्र नोंदणी केलेला दस्त देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच स्विकारतांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ मालेगाव कार्यालयातील लिपिक ज्ञानेश्वर खांडेकर (वय ३२) याच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

 

 

 

कार्यालयातील डाटा एन्ट्री ऑपरेटर विठोबा शेलार (वय ३६) व एजंट दत्तू देवरे यांनी तक्रारदाराकडे पाचशे रुपयांची मागणी केली होती. दुय्यम निबंधक कार्यालयातील खाजगी व्यक्ती (एजंट ) दत्तू देवरे याने पंचासमक्ष ५०० रुपये लाचेची मागणी केली.

 

 

 

तसेच ज्ञानेश्वर खांडेकर यांच्या सांगण्यावरून व त्यांनी दिलेल्या अपप्रेणेमुळे श्री. शेलार यांनी सदर लाचेची रक्कम स्वीकारली. तिघांविरुध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक नाना सूर्यवंशी, हवालदार सचिन गोसावी, पोलिस नाईक गणेश निंबाळकर, प्रमोद चव्हाणके, चालक परशुराम पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

 

तर दुसरीकडे सावकारीचा अहवाल सकारात्मक पाठविण्यासाठी निफाडच्या सहकार अधिकार्याने दीड लाखांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती एक लाखांची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

 

 

 

 

परंतु नंतर टाळाटाळ करू लागल्याने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोर सहकार अधिकाऱ्याला अटक केली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

निफाड येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेतील सहकार अधिकारी (श्रेणी१) राजेश शंकर ढवळे (५३, रा. कृष्णा अपार्टमेंट, चेतनानगर, इंदिरानगर, नाशिक) असे लाचखोर अधिकार्याचे नाव आहे.

 

 

 

 

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, सावकारीचा अहवाल सकारात्मक करून वरिष्ठ अधिकार्यांना द्यावा यासाठी लाचखोर अधिकारी ढवळे याने तक्रारदाराकडे गेल्या ६ सप्टेंबर २०२३ रोजी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

 

 

 

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. ‘लाचलुचपत’च्या पथकाने पडताळणी केली होती. त्यावेळी लाचखोर ढवळे याने पंचासमक्ष तडजोडीअंती लाचेची १ लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारीही दर्शविली होती.

 

 

 

 

दरम्यान, ढवळे हा सातत्याने टाळाटाळ करीत होता. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता.९) दुपारी लाचखोर ढवळे याने लाचेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करीत ढवळे यास अटक केली आहे.

 

 

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, दीपक पवार, संजय ठाकरे, अविनाश पवार, संतोष गांगुर्डे, मनोज पाटील यांनी केली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *