काँग्रेसला खिंडार पडणार ? १५ आमदार अजित पवारांच्या संपर्कात

Congress will be upset? 15 MLAs in touch with Ajit Pawar ​

 

 

 

माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यापाठोपाठ मुंबईतील काँग्रेसचे काही नेते सत्ताधारी पक्षांच्या संपर्कात आहेत. माजी मंत्री आणि आमदार बाबा सिद्दीकी लोकसभा निवडणुकीआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा आहे.

 

 

२०१४ च्या आधी वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पक्षाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झीशान सध्या वांद्रे पूर्वेतून आमदार आहेत.

 

 

 

तेदेखील वडिलांपाठोपाठ पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात. ३१ वर्षांचे झीशान पहिल्या टर्मचे आमदार आहेत. त्यांनी पक्षांतराची शक्यता नाकारली आहे. पण अजित पवार आपल्या कठीण काळात सोबत राहिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

 

 

मुंबईतील आणखी दोन मुस्लिम नेते काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सनं दिलं. मुंबादेवीचे आमदार अमिन पटेल आणि मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख काँग्रेसमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

 

 

 

मुंबईत काँग्रेसचे केवळ ४ आमदार आहेत. आमदार झीशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची मध्यंतरी ईडीकडून चौकशी झाली. तर अस्लम शेखही ईडीच्या रडारवर आहेत.

 

 

अमिन पटेल हे मिलिंद देवरांचे निकटवर्तीय मानले जातात. देवरांनी काँग्रेस सोडल्यानंतरही ते पक्षात कायम आहेत. पण या तीन आमदारांनी काँग्रेसची साथ सोडल्यास मुंबईत काँग्रेसचा केवळ एकमेव आमदार राहील. वर्षा गायकवाड विधानसभेत धारावीचं प्रतिनिधीत्व करतात.

 

 

 

 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आरिफ नसीम खान यांनाही सत्ताधारी पक्षाकडून ऑफर होती. मात्र त्यांनी काँग्रेस सोडण्यास नकार दिला.

 

 

 

‘सिद्दिकी आणि शेख सत्ताधारी पक्षांच्या संपर्कात आहेत. २७ फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीआधी, २० मार्चला राहुल गांधींची मुंबईत सांगता होण्यापूर्वी त्यांना आपल्याकडे घेण्याचा भाजपचा प्लान आहे,’ अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यानं हिंदुस्तान टाईम्सला दिली.

 

 

 

‘वरिष्ठ नेते दोन्ही आमदारांच्या संपर्कात आहेत. त्यांना पक्ष का सोडायचा आहे, त्यांच्या समस्या काय, ते जाणून घेतलं जात आहे,’ असं काँग्रेसच्या नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं.

 

 

 

महायुतीमधील पक्षांच्या संपर्कात असलेल्या आणखी एका नेत्यानं मोठा दावा केला. काँग्रेसचे १५ आमदार कुंपणावर आहेत. पुढील महिनाभरात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळतील, असा दावा त्यानं केला.

 

 

 

मिलिंद देवरांचे निकटवर्तीय असलेले अमीन पटेल शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले नाहीत. ते काँग्रेससोबतच आहेत. शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका त्यांच्यासाठी अडचणीची आहे.

 

 

 

पक्षांतराबद्दल विचारलं असता पटेल यांनी चर्चा फेटाळून लावली. भविष्यातील राजकीय प्लान काय असा प्रश्न विचारला असता त्यांनी मेसेजला स्माईलीनं उत्तर दिलं.

 

 

 

मुंबईत काँग्रेसला आणखी कमकुवत करण्यासाठी मुस्लिम नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या नेत्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय आहे.

 

 

 

सत्तेतील तीन प्रमुख पक्षांपैकी दोन पक्षांची विचारसरणी हिंदुत्ववादी आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी सेक्युलर असल्यानं मुस्लिम नेत्यांसमोर सत्तेत जाण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

 

 

अजित पवारांची मुंबईत फारशी ताकद नाही. काँग्रेसचे आमदार गळाला लावून मुंबईत स्वत:चा प्रभाव निर्माण करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत. मुंबईतील ३६ पैकी १० विधानसभा मतदारसंघांमध्ये मु्स्लिम मतांचं प्रमाण लक्षणीय आहे.

 

 

 

आमदार अस्लम शेख यांनी पक्षांतराच्या चर्चेवर बोलण्यास नकार दिला. तर झीशान सिद्दिकी यांनी आपण पक्ष सोडणार नसल्याचं म्हटलं आहे. वडिलांचा प्लान माहीत नाही, पण मी काँग्रेस सोडणार नाही, असं सिद्दिकी म्हणाले.

 

 

 

अजित पवार मला मुलासारखे वागवतात. त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे. तरुणांच्या प्रतिभेला ते प्रोत्साहन देतात, हे सांगायलाही सिद्दिकी विसरले नाहीत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *