आता माहितीपत्रकाद्वारे महाविद्यालयांना “हि” माहिती देणे बंधनकारक
Now it is mandatory to give "this" information to the colleges through the brochure

राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना आता शैक्षणिक वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यापूर्वी किमान ६० दिवस आधी शैक्षणिक अभ्यासक्रमांचे माहितीपत्रक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
तसे निर्देश राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना संस्थेकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कासह, प्राध्यापक अन्य बाबींची इत्यंभूत माहिती उपलब्ध होणार आहे.
शिक्षण संस्थेतील संबंधित अभ्यासक्रम शिकविणारे प्राध्यापक, त्यांची शैक्षणिक पात्रता, शिकविण्याचा अनुभव, त्यांची नियुक्ती नियमित की कंत्राटी पद्धतीने केली आहे,
याची संपूर्ण माहिती प्रवेशप्रक्रियेपूर्वी ६० दिवस आधी शिक्षण संस्थांना द्यावी लागणार आहे. तसेच शिक्षण संस्थेत शिकविले जाणारे कोर्सेस, त्यांच्यातील विषय आणि अभ्यासक्रम, त्या अभ्यासक्रमासाठी आकारले जाणारे शुल्क
आदींची माहिती द्यावी लागणार आहे. तसेच कॉलेजांकडून वाचनालयशुल्कापासून ते विविध बाबींसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काची माहितीदेखील द्यावी लागणार आहे.
अभ्यासक्रम पूर्ण होण्यापूर्वी विद्यार्थ्याने प्रवेश रद्द केल्यास शिक्षण संस्थांकडून त्याला किती शुल्क माघारी देण्यात येईल हेदेखील स्पष्ट करावे लागेल.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाप्रकरणी कॉलेजांकडून आकारल्या जाणाऱ्या दंडाचा तपशील या माहितीपत्रकात द्यावा लागणार असल्याचे उच्च शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांनी त्यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांची सर्व माहिती विद्यार्थ्यांना वेबसाइटवर उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोग
आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने वेळोवेळी दिले आहेत. मात्र शिक्षण संस्थांकडून याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
आता राज्य सरकारनेही त्याबाबतचे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे शिक्षण संस्थांना खोटी आश्वासने देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक करता येणार नाही.