उद्या नितीशकुमारांचा विश्वासदर्शक ठराव मात्र सहा आमदार अनुपस्थित,बिहारमध्ये राजकीय खळबळ
Tomorrow Nitishkumar's vote of confidence but six MLAs absent, political excitement in Bihar

बिहारमध्ये नितीशकुमार सरकारकडून येत्या सोमवारी घेण्यात येणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) आमदारांना भोजनासाठी शनिवारी एकत्र बोलावले होते. मात्र, सहा आमदार न आल्याने उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
नितीशकुमार यांचे निकटवर्तीय असलेले; तसेच पक्षाचे प्रतोद श्रवणकुमार यांनी आमदारांसाठी भोजनाचे आयोजन केले होते. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची पळवापळवी टाळण्यासाठी
भोजनाच्या बहाण्याने आमदारांना एकत्रित आणण्याचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ‘विधानसभा अधिवेशनापूर्वी शनिवारी आयोजित केलेले दुपारचे जेवण
आणि दुसऱ्या दिवशी विजयकुमार चौधरी यांच्या घरी आयोजित केलेले चहापान हा पक्षाच्या परंपरेचा भाग आहे,’ अशी सारवासारव श्रवणकुमार यांनी केली आहे.
‘सोमवारी विश्वासदर्शक ठराव जिंकण्याचा पक्षाला विश्वास आहे. आम्ही सहसा विधानसभेचे प्रत्येक अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भेटतो. यापूर्वी पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांच्या निवासस्थानी अशा प्रकारचे मेळावे आयोजित करण्यात आले होते,’
असे ‘जेडीयू’चे राष्ट्रीय सरचिटणीस आफाक अहमद खान यांनी सांगितले. दुसरीकडे, काही आमदार आजारी आहेत, तर काही जण कौटुंबिक कारणांमुळे आलेले नाहीत, असे पक्षाने सांगितले.