माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ , काय आहे कारण?
Former Home Minister Anil Deshmukh's problem increase, what is the reason?

माजी मंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ‘क्लीन चिट’ दिल्याची माहिती कथितरीत्या फोडल्याप्रकरणी देशमुख यांची कन्या पूजा आणि सून राहत यांच्याविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे.
संस्थेने सन २०२१ मध्ये सादर केलेल्या अंतर्गत अहवालात ही क्लीन चिट दिली, अशी माहिती त्यावेळी प्रसृत झाली होती.
सीबीआयने सोमवारी या प्रकरणात सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात पूजा आणि राहत यांची नावे कट रचण्यातील साथीदार म्हणून समाविष्ट केली आहेत. या दोघींनी देशमुख यांचे वकील आनंद दिलीप डागा यांच्या प्रवासाची सोय केली.
त्याद्वारेच डागा यांनी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना लाच देऊन त्यांच्याकडून या अहवालाचा मसुदा मिळवला, असे आरोपपत्रात म्हटल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनिल देशमुख यांनी मुंबईतील हॉटेलचालक आणि बारचालकांकडून खंडणी गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी केला होता.
त्या आरोपाचा तपास करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिला होता. या तपासाचा अहवाल सीबीआयने न्यायालयात सादर केला. ‘देशमुख यांच्याकडून कोणताही दखलपात्र गुन्हा घडलेला नाही’,
असे अहवालात म्हटल्याची माहिती त्यावेळी फुटली होती. या प्रकरणात सीबीआयने अभिषेक तिवारी आणि आनंद डागा यांना अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्र सादर केले आहे.
त्याच प्रकरणात सीबीआयने सोमवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये पूजा आणि राहत यांच्याखेरीज अनिल देशमुख यांचा दूरचा नातेवाईक विक्रम देशमुख आणि सत्यजीत वायाळ नामक व्यक्तीचाही समावेश आहे.
– पूजा देशमुख यांच्या सूचनेवरून सीबीआय तपासाविरोधात घोषणा, व्हिडीओ कंटेट तयार करण्यासाठी छापील मजकूर, ट्वीट आणि छायाचित्र बॅनर आदी तयार करण्यात आल्याचे संबंधितांच्या व्हॉटसअॅप ग्रुप चॅटद्वारे दिसून आले.
– पूजा यांनी आनंद डागा यांची पिंपरी-चिंचवडमधील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या अतिथीगृहात जाण्यासाठी प्रवास व्यवस्था करून दिली. तपासकामासाठी तिवारी तिथे उतरला होता.
डागाने तिवारीकडून अहवालाचा मसुदा मिळवला. त्याबदल्यात तिवारीला ९५ हजार रुपयांचा आयफोन १२ प्रो देण्यात आला, असेही ग्रुप चॅटद्वारे समजले.
– डागाला पुण्याला नेण्यासाठी पूजा देशमुख यांनी कुटुंबाची इनोव्हा गाडी आणि वाहनचालकाची व्यवस्था केली होती. सीबीआयच्या अहवालाचे मुखपृष्ठ,
प्रिंटिंग प्लॅन आणि साहित्य अनिल देशमुख यांचे समाजमाध्यमांचे काम पाहणारे वैभव तुमाने यांना पाठवण्यास सांगितले होते, जेणेकरून समांतर मीडिया ट्रायल चालवता येईल, असेही आरोपपत्रात म्हटले आहे.