वातावरण तापले;ओबीसी नेत्यांची फडणवीसांसोबत बैठक
Atmosphere heats up; OBC leaders meet with Fadnavis
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यातील ओबीसी नेत्यांची एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर संपन्न झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी शिंदे समिती आणि मराठा समाजावर खरमरीत टीका केली.
प्रकाश शेंडगे म्हणाले की, मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यास आमचा विरोध आहे. त्यामुळे मराठावाड्यामध्ये आमचे दोन मोठे मेळावे होणार आहेत.
पहिला मेळावा अंबड इथं १५ तारखेला होत असून दुसरा मेळावा १६ तारखेला हिंगोली इथं होणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ असे विभागीय मेळावे होतील, असं शेंडगेंनी स्पष्ट केलं.
पुढे बोलताना शेंडगे म्हणाले की, जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांनी या मागणीला समर्थन दिलेलं असून पारदर्शक प्रक्रिया ठरवण्याचं काम सुरु असल्याचं स्पष्ट केलं.
मराठा समाजा मागास नाही, हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. मागास असलेल्या कुणबीमध्ये घुसायचं आणि आरक्षण घ्यायचं, हा आरक्षणाचा मार्ग नाही. शिंदे समितीला कुणी अधिकार दिले, मागास सिद्ध करण्याचे.
शिंदे समितीला आमचा टोकाचा विरोध आहे. त्यामुळे समितीला आम्ही घटनात्मकदृष्ट्या आव्हान देणार आहोत. समिती नेमूण कुणालाही मागास ठरवता येत नाही.
शिंदे समिती ही नियमबाह्य असून तिला घटनात्मक अधिकार नाहीत. मराठा समाजाने मागासवर्गीयांचे भोग भोगलेले नाहीत. ते आम्ही भोगलेले आहे.
फक्त सर्टिफिकेट घ्यायचं आणि मागास व्हायचं, हे जमणार नाही. त्याबाबतीतला व्यापक लढा उभा करत असल्याचं शेंडगेंनी स्पष्ट केलं.