महायुती,महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून घमासान
Ghamasan from the post of Chief Minister in Mahayutti, Mahavikas Aghadi
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून पक्षस्तरीय बैठका सुरू झाल्या आहेत. २०१९ पेक्षा यंदाची राजकीय गणितं आणि समीकरणं वेगळी आहेत.
आचारसंहिता लागू होऊन चार दिवस उलटले तरी जागा वाटप जाहीर झालेलं नाही. तसंच, महायुती आणि महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहराही उलगडू दिलेला नाही.
त्यामुळे महाराष्ट्राच्या गादीवर आता कोण बसणार असा प्रश्न निर्माण होतोय. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत महाविकास आघाडीत विसंगती असून महायुतीतही अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं सातत्याने समोर येतंय.
दरम्यान, शिवसेना पक्ष (एकनाथ शिंदे) यांच्या पक्षस्तरीय बैठकीत नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, अशी मागणी केली.
नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा, रवींद्र वायकर, मनीषा कायंदे, राहुल शेवाळे आदी नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा म्हणून सादर करा, अशी जोरदार मागणी या बैठकीतून करण्यात आली. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत भगवा झेंडा अभिमानाने फडकवत राहा,
असं शिवसेना नेत्यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेते आणि आमदार दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक करत नाथांचे नाथ,
एकनाथ शिंदे आहेत, अशी घोषणाबाजी केली. तर, प्रकाश सुर्वे यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या नेत्यावंर ताशेरे ओढले.
“फक्त एक महिना काम करायचं आहे. आपल्याला महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार आणायचं आहे. आपल्याला फक्त लोकांपर्यंत जाऊन सरकारी योजनांची माहिती द्यायची आहे.
आज राज्यातील वातावरण अतिशय गढूळ आहे. काहीही असो. विरोधक कितीही शिव्या देऊ द्या, एकनाथ शिंदे यांच्यावर जनतेचे प्रेम आहे. चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना जनतेचे प्रश्न कळणार नाहीत”, असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
“एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली महायुती निवडणूक लढवणार आहे”, असं मनीषा कायंदे म्हणाल्या. “मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही निश्चित फॉर्म्युला ठरलेला नाही.
मुंबईत शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे मुंबईत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवत आहोत”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.