छगन भुजबळ ,समीर भुजबळांवर भडकले ,म्हणाले राजकारणातील सर्व पुतणे तसेच
Chhagan Bhujbal, Sameer Bhujbal got angry, said all the nephews in politics as well.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.
विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे सध्या उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरु आहे.
यातच काही नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष सोडत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
समीर भुजबळ यांच्या या निर्णयाबाबत आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत खोचक टीका केली आहे. “राजकारणात असलेल्या सर्वच पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे
, असं वाटायला लागलंय”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर छगन भुजबळ यांनी यावेळी शरद पवार आणि अजित पवार, गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचंही उदाहरण दिलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
“राजकारणात असलेल्या सर्वच पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे, असं वाटायला लागलंय. शरद पवार यांचा पुतण्या, अजित पवारांचा पुतण्या, गोपीनाथ मुंडेंचा पुतण्या,
बाळासाहेब ठाकरेंचा पुतण्या, अशी अनेक पुतणे कंपनी आहे, हे सर्व काकांचं ऐकतात असं वाटत नाही. त्यामुळे राजकारणातील सर्वच पुतण्यांचा एक वेगळाच डीएनए आहे”,
असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान, समीर भुजबळ यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे छगन भुजबळांनी त्यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ यांच्या घरात बंडखोरी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. छगन भुजबळांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष सोडत
अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. समीर भुजबळ हे आता सुहास कांदे यांच्या विरोधात नांदगावमध्ये निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
पक्षाला मोठा धक्का बसला. समीर भुजबळ हे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळे नांदगावमधील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षला निवडणुकीच्या तोंडावर सोडचिठ्ठी दिली. समीर भुजबळ हे आता नांदगावमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.
या निर्णयासंदर्भात बोलताना समीर भुजबळ यांनी म्हटलं की, “साधारण वर्षभरापूर्वी माझ्यावर विश्वास ठेवून मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्याकडे सुपूर्द केली होती.
ही जबाबदारी पार पडत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण संघटन मजबुतीने उभं केलं. यामध्ये जिल्हाध्यक्ष पासून बुथपर्यंत संघटनेची बांधणी आपण केली.
मात्र भुजबळ कुटुंबीयांच्या ऋणानुबंध असलेल्या नांदगावमध्ये परिस्थिती अतिशय बिकट आहे. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातील वातावरण अतिशय दूषित झालेले असून येथील नागरिक भयभीत आहेत.
नांदगाव मधील कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांनी आपली भेट घेऊन याबाबतली कैफियत आपल्यासमोर मांडली होती. नांदगावमधील नागरिकांची वाढत असलेली मागणी
आणि नांदगाव मधील दहशतीचे वातावरण बदलण्यासाठी या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे”, असं समीर भुजबळ यांनी म्हटलं.