महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ? काय म्हणाले एकनाथ शिंदे

Who is the face of the chief ministership in the grand alliance? What did Eknath Shinde say?

 

 

 

बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, की काँग्रेसला दूर ठेवा. नाहीतर मी माझं दुकान बंद करेन. पण त्यांच्याच मुलाने मुख्यमंत्रीपदाच्या मोहात काँग्रेसशी हातमिळवणी करत युती केली.

 

वैयक्तिक स्वार्थासाठी , मोहाच्या जाळ्यात अडकून त्यांनी ( उद्धव ठाकरे) काँग्रेससोबतच सरकार स्थापन केलं, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

आम्ही कार्यकर्ते आहोत, पक्षाचा आदेश मानतो, शिस्त असते ती पाळतो. परिस्थिती बदलेल का, शिवसेना-भाजप युती पुन्हा होईल का याचा आम्ही विचार करत होतो. पण आमच्या लाख प्रयत्नानंतरही ते शक्य झालं नाही.

 

शिवसेनेते, शिवसैनिकांचं नुकसान होत होतं, शिवसेना संपुष्टात येत असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आणि भाजपासोबत गेलो. ठाकरेंच्या भूमिकेमुळे शिवसेनेचें मोठं नुकसान होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

 

महाराष्ट्रातील जनतेलाही शिवसेना-भाजपची युती हवी होती, राज्यभरात तोच आवाज होता म्हणून आम्ही हा निर्णय घेत सरकार पलटलं. आणि शिवसेना-भाजप सरकार आणलं या निर्णयावर मला गर्व आहे.

 

याचा मला आनंद आहे, कारण गेल्या दोन-अडीच वर्षांत आम्हाल संधी मिळाली, खूप कामही केलं. वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून आम्ही सामान्य जनतेच्या हितासाठी झटलो, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

 

आम्ही जे काम केलं त्याचं कौतुक खुद्द पंतप्रधानांनी केलं. केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार एकाच विचारसरणीचं आहे, त्याचा आम्हाला बराच फायदा झाला. मी स्वत:ला CM म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजतो, असं ते म्हणाले.

 

महाराष्ट्रात येत्या 20 तारखेला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतही जय्यत तयारी सुरू असतानाच मुख्यमंत्रिपदाचा पुढील चेहरा कोण असेल याचीही चर्चा रंगली आहे.

 

यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महायुतीतील सगळे समान आहेत, कोणीही पहिला किंवा दुसरा येत नाही. सध्या महायुतीला विजय मिळवून देण्याचेच उद्दिष्ट आहे, असे शिंदे म्हणाले.

 

राज्यात महायुतीचं सरकार आलं तर तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री बनवणार का ? या प्रश्नावर एकनाथ शिंदे स्पष्ट बोलले – ” सध्या मी या टीमचा लीडर आहे आणि आमची टीम काम करत आहे.

 

आमच्याकडे पहिला, दुसरा किंवा तिसरा असा कोणताही फॉर्म्युला नाही. आम्ही एक टीम म्हणून काम करत आहोत ज्यात सर्वजण समान आहेत. पण विरोधी पक्षाकडे बघाल तर तिथे मुख्यमंत्रीपदावरूनच रस्सीखेच सुरू आहे.

 

ज्याला बघाव त्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे, वाद सुरू आहे. जनतेला काय देऊ शकतो ? असा विचार करणाऱ्या लोकांचीची राज्यातील जनतेला गरज आहे” असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी मविआवर टीकास्त्र सोडलं.

 

 

“तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना विचारा, आम्ही कधीच भेदभाव केलेला नाही. आम्हाला एकमेकांबद्दल खूप आदर आहे. पद हे कधीच कायमस्वरूपी नसते, त्यातून काहीच मिळत नाही, एकमेकांबद्दल आदर असणे ही खूप मोठी गोष्ट आहे.

 

लोकप्रियतेच्या बाबतीत एकनाथ शिंदे पहिल्या क्रमांकावर असल्याचे लोक म्हणतात, हे काम जनतेने केले आहे. स्वतःला नंबर देणारे आम्ही कोण आहोत ?

 

त्यामुळे आमच्यात स्पर्धा नाही. येत्या पाच वर्षात लोकांच्या लक्षात राहतील एवढी कामे करणे हेच आमचे ध्येय आहे ” असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

 

मविआकडे बघा, आज मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यातच एकमत नाहीये. मग असे लोक जनतेला तरी कसे आवडतील ? महायुतीमध्ये कोणतीही स्पर्धा नाहीये.

 

राज्यात महायुतीचं सरकार आणणं आणि राज्याचा विकास करणं, सामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवणं हेच आमचं ध्येय आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *