फक्त 50 जागांवर लढून,अजित पवार मुख्यमंत्री कसे होणार? दादांनी सांगितला प्लॅन
How can Ajit Pawar become Chief Minister by fighting only 50 seats? Dada said math

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरुन बरीच चर्चा झाली. असेच काहीसे चित्र महाविकास आघाडीमध्ये दिसून आलं.
अनेक जागांवर तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत निर्णय झाला नव्हता. सारं बेरीज-वजाबाकी करुन प्रत्येक घटक पक्षाच्या वाट्याला कमी अधिक जागा आल्या.
यामध्ये महायुतीत सर्वाधिक जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या. त्या खालोखाल मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जागा मिळाल्या आणि सर्वात कमी जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या.
त्याचवेळी दुसरीकडे महायुतीमधील मुख्यमंत्री कोण हा प्रश्नही चांगलाच चर्चेत आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यक्रमात 50 जागांवर लढूनही कशाप्रकारे मुख्यमंत्री होणार?या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.
युतीच्या सरकारमध्ये काही तडजोड करावी लागते, असं अजित पवारांनी ‘झी 24 तास’च्या मुलाखतीमध्ये सांगितलं. हाच धागा पकडून कमलेश सुतार यांनी, “निवडणुकीच्या राजकारणात तुम्हाला फार तडजोड करावी लागली का?
तुमच्याकडे 40 आमदार आहेत त्यांच्याकडेही 40 आमदार आहेत. तुम्हीच म्हणालात त्या कार्यक्रमात, मी काही बोलत नाही. 40 त्यांच्याकडे ते मुख्यमंत्री झाले.
40 आमदार त्यांचे त्यांना 80 जागा मिळतात. तुम्हाला 50 जागा मिळतात,” असा प्रश्न विचारला. यावर अजित पवारांनी हसतच, “ते मुख्यमंत्री आहेत. मी उपमुख्यमंत्री आहे. त्यामुळे थोडा फरक पडणार,” असं उत्तर दिलं.
“कार्यकर्त्यांमध्ये यातून काही मेसेज जातो असं वाटतं का?” या प्रश्नावर अजित पवारांनी, “तुमच्या माझ्या महाराष्ट्रात 85 पासून एका पक्षाचं सरकार कधीच आलं नाही.
महाराष्ट्राची राजकीय, भौगोलिक परिस्थिती आणि राज्यातील जनतेची विचार करण्याची पद्धत बघता मला नाही वाटत पुढील 20-25 वर्षात एका पक्षाचं सरकार येईल. 2014 ला भाजपाने प्रचंड प्रयत्न केला पण तो यशस्वी नाही झाला,” असं अजित पवार म्हणाले.
“जागा कमी असल्याने कार्यकर्त्यांमध्ये काय मेसेज जातो? तुम्ही म्हणाल कार्यकर्त्यांचा उत्साह आहे की दादांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे. पण 50 जागांमध्ये अजितदादा कसे मुख्यमंत्री होणार?”
असा प्रश्न कमलेश सुतार यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी हसतच, ‘कमलेशजी, एकनाथराव शिंदे किती जागांवर मुख्यमंत्री झाले?
देवेगौडाजी किती जागांवर पंतप्रधान झाले?’ मी आपलं तुम्हाला आठवण करुन देतोय,” असं उत्तर दिलं. “तुम्ही असं म्हणताय की 50 जागांवर दादा मुख्यमंत्री होऊ शकतात,”
असं हे उत्तर ऐकल्यावर कमलेश सुतार यांनी म्हटलं. त्यावर अजित पवारांनी, “नाही तसं नाही. राज्यामध्ये आधी महायुतीच्या सरकारच्या पावणेदोनशेपेक्षा अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य आहे. त्या निवडून आल्यानंतर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ,” असं म्हटलं.