शेतकऱ्यांचे 3 लाख माफ,लाडक्या बहिणींना 3000 ,बेरोजगारांना 4,000 ,गॅस सिलेंडर 500 रुपये ,पैसे कोठून आणणार ,मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?
3 lakh pardon, 3000 for beloved sisters, 4,000 for unemployed, gas cylinder 500 rupees, where will the money come from, what did Mallikarjun Kharge say?

महाविकास आघाडीने आज (10 नोव्हेंबर) जाहीरनामा प्रसिद्ध केला. महाविकास आघाडीकडून महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.
सरकार सत्तेवर आल्यास 100 दिवसांचा अजेंडाही सादर केला आहे. महाविकास आघाडीने महिला, शेतकरी, युवक, आरोग्य, उद्योग, सामाजिक न्याय, सुशासन आणि शहरी विकासाच्या प्रश्नांवर काम करण्याचे आश्वासन दिले आहे.
याशिवाय महाराष्ट्राच्या सन्मानासाठी प्रयत्न करण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात लाडकी बहिण योजना सुरु झाल्यानंतर कोणताही विचार न करता योजना सुरु करण्यात आली,
असा विरोधकांकडून आरोप करण्यात आला होता. यानंतर आता महाविकास आघाडीकडून योजनेतील पैसे वाढवण्याचे सूतोवाच केले आहेत.
त्यामुळे या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रावर किती कोटींचा बोजा वाढणार याबाबत महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली.
यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी योजनांसाठी पैशांची विचारणा केली असता ते म्हणाले की, तुम्ही आम्हाला सरकार द्या, आम्ही तुम्हाला बजेट देऊ.
मल्लिकार्जुन खरगे यांच्या या उत्तरानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार खासदार सुप्रिया सुळे आणि नेहमी आक्रमक पावित्र्यात असणाऱ्या संजय राऊत यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटल्याचे दिसून आले.
सुप्रिया सुळे यांनी टाळी वाजवून दाद दिली. यावेळी खरगे यांनी कर्नाटक पंचसूत्री योजनेवर कोणत्या पद्धतीने खर्च करण्यात येत आहे याबाबत माहिती दिली.
दरम्यान, महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात महिलांकडे विशेष लक्ष दिले आहे. महिलांसाठी मोफत बस प्रवासाचीही घोषणा करण्यात आली आहे.
याशिवाय त्यांना वर्षभरात 500 रुपयांमध्ये सहा गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. महिलांसाठी शक्ती कायदा लागू केला जाईल.
9 ते 16 वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस मोफत दिली जाईल. मासिक पाळीच्या दिवसात दोन दिवसांची रजा दिली जाईल.
आघाडीने शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.
आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा आणि मुलांसाठीच्या सध्याच्या योजनेत सुधारणा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव
मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील. याशिवाय पीक विमा योजनेतील अटी काढून विमा योजना सुलभ करण्याचे काम केले जाणार आहे.
तरुण पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षित बेरोजगारांना दरमहा 4,000 रुपयांपर्यंत भत्ता देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारच्या अडीच लाख जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’ची व्याप्ती वाढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विमा योजनांचा पुनर्विचार करून उपचार सुविधांचा विस्तार केला जाईल. सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत औषधे देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
नवीन औद्योगिक धोरण करणार असल्याचे महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात म्हटले आहे. महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन दिले जाईल. राज्यात सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्यात येणार आहे.