अजबच … काँग्रेसचा उमेदवार प्रचार करताना पोहोचला थेट भाजप कार्यालयात
Strangely... the Congress candidate reached the BJP office while campaigning
निवडणूक आली की नेत्यांकडून होणारी टीका, त्यांना दिली जाणारी प्रत्युत्तरं आली. अनेकदा निवडणूक प्रचारात एकमेकांवर कडवी टीका केली जाते.
त्यामुळे वाद होतात. कार्यकर्त्यांची डोकी फुटतात. सध्या निवडणुकीचा माहोल असताना, प्रचारसभांमधून एकमेकांवर जोरदार टीका होत असताना काँग्रेसच्या एका उमेदवाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रचार करणारा काँग्रेस उमेदवार थेट भाजपच्या कार्यालयात गेला. त्याला पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. उमेदवाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसनं बंटी शेळकेंना उमेदवारी दिली आहे. तर भाजपनं प्रविण दटकेंना तिकीट दिलं आहे. दोन्ही उमेदवारांचा सध्या जोरदार प्रचार सुरु आहे.
बंटी शेळके प्रचार करता अचानक भाजपच्या कार्यालयात पोहोचले. त्यांना भाजप कार्यालयात सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयातील सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
बंटी शेळके प्रचार करताना भाजपच्या कार्यालयात गेले. लाल टीशर्ट आणि निळ्या जीन्समध्ये प्रचार करणाऱ्या शेळकेंनी थेट प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या पक्षाच्या कार्यालयात एन्ट्री मारली. तिथे प्रविण दटके यांचे मोठमोठे बॅनर लागलेले होते.
शेळकेंनी त्यांच्या वयाच्या भाजप कार्यकर्त्यांसोबत हस्तांदोलन केलं. काही कार्यकर्त्यांनी तर शेळकेंना आलिंगनही दिलं. यावेळी शेळकेंनी त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या व्यक्तींना वाकून नमस्कार केला. ज्येष्ठांनी शेळकेंना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यानं शेळके यांनी रोखलं नाही. विरोधी पक्षाचा उमेदवार असूनही भाजपच्या कार्यकर्त्यांनी हस्तांदोलन करुन, मिठी मारुन स्वागत केलं.
दोन्ही बाजूनं दाखवण्यात आलेला हा उमेदपणा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राजकारणात कटुता नसावी, याची प्रचिती देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भाजप कार्यालय भेटीचा व्हिडीओ बंटी शेळकेंनी एक्सवर पोस्ट केला आहे. ‘माझा लढा कोणत्याही व्यक्तीशी नाही, तर ती विचारांशी आहे. मध्य नागपूर असो वा संपूर्ण नागरिक, इथला प्रत्येक नागरिक,
मग तो कोणत्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा असो, प्रत्येक जण माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मी प्रत्येक नागरिकासाठी सदैव तत्पर आहे, कायम हजर आहे आणि हाच माझा संकल्प आहे,’ असं बंटी शेळकेंनी व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.