उमेदवाराचा थेट बॉण्ड पेपरवर जाहीरनामा, आश्वासने पूर्ण केली नाहीत तर गुन्हा दाखल करा
Manifesto of the candidate directly on the bond paper, file a case if promises are not fulfilled
मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार अनोख्या शकला लढवतायत. त्यातच कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराने आयडियाची कल्पना केलीये.
कायमच उमेदवार हे जनतेला आश्वासनं देतात आणि निवडले गेलेत की सर्व आश्वासनं पद्धतशीर विसरतात. हाच जनतेतील अविश्वास दूर करण्यासाठी अपक्ष उमेदवार गिरीश पाटील यांनी चक्क 500 रुपयांच्या बाँडपेपरवर त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय.
“मी गिरीश बाळासाहेब पाटील कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. माझा निवडणूक जाहीरनामा मी बाँडपेपरवर नोटरी करून जनतेला देत आहे.
यातील आश्वासनं पूर्ण न केल्यास किंवा जाहीरनाम्यात नमूद केलेले जनतेचे प्रश्न सोडवण्या साठी काहीच प्रयत्न न केल्यास मी जनतेला माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार देत आहे.” असं गिरीश पाटील यांनी बाँडपेपरवर लिहून दिलंय.
गिरीश पाटील यांनी अनोख्या स्वरूपात सादर केलेला हा जाहीरनामा यामुळे सगळीकडे आता या स्मार्ट उमेदवाराची चर्चा होतेय. या बाँडपेपरवर जवळजवळ १८ वेगवेगळ्या गोष्टी नमूद केल्या आहेत.
दरम्यान या गोष्टींची पूर्तता झाली नाही किंवा काहीच प्रयत्न न केल्यास माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा कायदेशीर अधिकार या उमेदवाराने मतदारांना दिलाय.
मतदार राजाचा उमेद्वारांबद्द्लचा समज बदलण्यासाठी अश्या प्रकारचा जाहीरनामा सादर करण्यास काहीच हरकत नाही असं मत गिरीश पाटील यांनी मांडलं आहे.
गिरीश पाटील हे स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. पुण्यातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून राहिलेले आयुष्य समाजासाठी देण्यासाठी ते कोल्हापूर ला आपल्या स्वगृही परत स्थानांतरित झाले आहेत.
वेग वेगळी आंदोलने, निवेदने, चळवळी यांच्यामार्फत ते जनतेचे प्रश्न सोडवण्यात नेहमीच पुढाकार घेत असतात. दरम्यान मी शंभर टक्के निवडून येईन असा विश्वास गिरीश पाटील यांनी व्यक्त केलाय.