चक्क पंतप्रधानांनी सुप्रिया सुळेंचं जुळवले होते लग्न ,सुळेंनीच सांगितला किस्सा !

The prime minister had arranged the marriage of Supriya Sule, Sule told the story

 

 

 

राजकीय टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोप सुरू असताना काही मुलाखतींमध्ये स्टार प्रचारक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही बोलत आहेत.

 

सुप्रिया सुळे यांनी लल्लनटॉपशी बोलत असताना त्यांचं लग्न कसं जमलं, त्यासाठी कोणी कोणी सहकार्य केलं याबाबत सांगितलं आहे.

“भाजपाविरोधात माझी लढाई असली तरीही ती राजकीय लढाई आहे. वैयक्तिक लढाई नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे दिल्लीत जितके मैत्रीपूर्ण संबंध नसतील तेवढे माझे आहेत.

 

माझे आणि सदानंद सुळे यांचे अनेक भाजपाच्या नेत्यांबरोबर कौटुंबिक संबंध आहेत. आमचा ग्रुपही आहे. आम्ही मिनी पार्लिमेंट चालवू शकतो”, असं सुप्रिया सुळे मिश्किलीत म्हणाल्या.

 

“जय पांडा आणि नीरज शेखर सिंग यांना २५ वर्षांपासून आम्ही ओळखतो, नीरज तर माझे भाऊ आहेत. कारण चंद्रशेखर यांना मी काका मानायचे. माझं लग्नही त्यांनीच जुळवलं होतं.

 

जसं बाळासाहेब ठाकरेंची भूमिका माझ्या लग्नासाठी होती, तसंच चंद्रशेखर यांचीही भूमिका होती”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“चंद्रशेखर काका म्हणून आमच्या घरात यायचे. नीरज, सुषमा यांच्याबरोबर माझं कौटुंबिक नातं होतं. चंद्रशेखर १९९० मध्ये पंतप्रधान बनले होते, तेव्हा माझ्या लग्नाची चर्चा सुरू होती.

 

बाळासाहेब ठाकरे त्यात जास्त सहभागी होते. माझे सासरे बी. आर. सुळे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. बी. आर. सुळे महिंद्राचे एमडी होते. बाळासाहेबांना जेव्हा कळलं की हे नातं जुळलं जातंय,

 

तेव्हा त्यांनी शरद पवारांना फोन केला आणि म्हणाले की राजकारण होत राहील, पण सुप्रियाचं लग्न मी जुळवणार. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी जाऊन माझ्या सासऱ्यांशी चर्चा केली.

 

माझे सासरेही गोंधळले की इथून शरद पवारांचा फोन येतोय, तिथून बाळासाहेबांचा येतोय”, अशी आठवणही सुप्रिया सुळे यांनी सांगितली.

“एकदा चंद्रशेखर आणि आम्ही दिल्लीत बसलो होतो. तेव्हा माझ्या आईने त्यांना सांगितलं की माझ्या लग्नाची चर्चा सुरू आहे. तेव्हा त्यांनी विचारलं की कोणाबरोबर सुरू आहे?

 

ते म्हणाले की मी त्याच्याशी (सदानंद सुळे) बोलणार. तेवढ्यात शरद पवार म्हणाले की तुम्ही पंतप्रधान आहात, तुम्ही हे सोडून टाका आणि आता देश चालवा. तर ते म्हणाले देश तर मी चालवेनच,

 

पण ही माझ्या घरातील मुलगी आहे. कोण मुलगा आहे, त्याला फोन लावा. तर शरद पवार म्हणाले की तो अमेरिकेतला आहे. आता झोपला असेल.

 

तर चंद्रशेखर म्हणाले की मग किती वाजता फोन लावू. आम्ही तिथेच गोष्ट सोडली”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी पुढचा गंमतीशीर किस्साही सांगितला.

 

“त्यानंतर मला सदानंद यांनी फोन केला. ते म्हणाले की कोण मला फोन करत होतं? माझी मस्करी करताय का? कसं कुटुंब आहे तुमचं? पंतप्रधानांचंही नाव घेणार तुम्ही? एका माणसाचा फोन आला होता,

 

म्हणाला मी भारताचा पंतप्रधान बोलतोय. मग मी म्हणालो की मग मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बोलतोय”, असं म्हणत सदानंद सुळे यांचा झालेला गोंधळही त्यांनी सांगितला.

 

“मी त्यांना म्हणाले की खरंच भारताच्या पंतप्रधांनांनी फोन केला होता. म्हणा त्यांचं वयही होतं, आगाऊपणाही होता. कोणी असा विचारही करू शकत नाही. मग सकाळी मी चंद्रशेखर यांना जाऊन भेटले आणि त्यांची माफी मागितली”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *