विधानसभेच्या ‘या’ १० हाय-प्रोफाईल लढतीं ;कुठे काका-पुतण्या तर कुठे बाप-लेक
Here are 10 high-profile fights in the Legislative Assembly; where uncle-nephew and where father-leke
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी आज (२० नोव्हेंबर) रोजी मतदान होत आहे. निवडणुकीचा निकाल २३ तारखेला जाहीर होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळत असून मनसे,
वंचित बहुजन आघाडी असे पक्षदेखील निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. यादरम्यान महाराष्ट्राची जनता नेमकी कोणाच्या हातात सत्ता देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान आज आपण महाराष्ट्रातील १० हाय प्रोफाईल लढतींबद्दल जाणून घेणार आहोत.
बारामती: अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार (राष्ट्रवादीचे दोन गट)
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा निवडणुकीत यंदा काका विरूद्ध पुतणे असा पुढच्या पिढीतील सामना पाहायला मिळत आहे.
काही दिवसापूर्वी (महिन्यांपूर्वी) झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव पत्करावा लागला होता, यानंतर सलग आठव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकून अजित पवार या मतदारसंघावर आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांनी नातू युगेंद्र पवार यांना पहिल्यांदाच संधी दिली आहे.
नागपूर दक्षिण पश्चिम: देवेंद्र फडणवीस (भाजपा) विरुद्ध प्रफुल्ल गुडधे (काँग्रेस)
राज्यातील भाजपाचे बडे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसने प्रफुल्ल गुडधे यांना मैदानात उतरवले आहे.
हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला असला तरी येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सर्वत्र जोरदार प्रचार केला आहे, मात्र त्यांच्यापुढे होमग्राऊंडवर काँग्रेसचे प्रभावशाली नेते गुडधे यांचे तगडे आव्हान असणार आहे.
शिर्डी : राधाकृष्ण विखे-पाटील (भाजप) विरुद्ध प्रभावती घोगरे (काँग्रेस)
शिर्डी या मतदारसंघात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सामना हा प्रभावती घोगरे यांच्याशी आहे. घोगरे या त्यांच्या दमदार भाषणांसाठी तसेच विखेंवर जोरदार टीका करण्यासाठी ओळखल्या जातात.
तसेच विखे-पाटील यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाने येथे आपली संपूर्ण शक्ती लावल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसच्या दिग्गज नेत्या प्रियांका गांधी यांनी देखील घोगरे यांच्यासाठी या मतदारसंघात प्रचार सभा घेतली होती.
कोल्हापूर उत्तर : राजेश क्षीरसागर (शिवसेना) विरुद्ध राजेश लाटकर (अपक्ष)
काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरीमाराजे छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज अगदी अखेरच्या क्षणी मागे घेतल्याने काँग्रेसची चांगलीच नाचक्की झाली.
यानंतर काँग्रेस पक्षाला या मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना पाठिंबा द्यावा लागला. तर दुसरीकडे माजी आमदार राजेश क्षीरसागर पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. नाट्यमय घडामोडींनंतर सर्वांचे लक्ष लागलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे.
नांदगाव: सुहास कांदे (शिवसेना) विरुद्ध समीर भुजबळ (अपक्ष) विरुद्ध गणेश धात्रक (शिवसेना-ठाकरे)
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे नेते समीर भुजबळ हेदेखील निवडणूक मैदानात उतरले आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुहास कांदे यांनी विभाजन न झालेल्या राष्ट्रवादीचे उमेदवार पंकज भुजबळ यांचा पराभव केला होता. यंदा या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे गणेश धात्रक यांना उमेदवारी मिळाली आहे.
भोकर: तिरूपती कोंडेकर (काँग्रेस) विरुद्ध श्रीजया चव्हाण (भाजपा)
मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तर त्यांच्याविरोधात काँग्रेसने देखील नवख्या उमेदवाराला मैदानात उतरवले आहे.
तिरूपती कोंडेकर उर्फ पप्पू पाटील हे काँग्रेसचे तरूण उमेदवार असून तरुण मतदारांवर त्यांचा चांगला प्रभाव पाहायला मिळतो. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले होत.
दरम्यान सध्या राज्यसभा सदस्य असलेल्या चव्हाण यांनी आपल्या कन्येच्या विजयासाठी दिवसरात्र प्रचार केला आहे. तर दुसरीकडे चव्हाण यांना धडा शिकवण्यासाठी काँग्रेसनेही आपल्या सर्व वरिष्ठ नेत्यांना या मतदारसंघात तैनात केले आहे.
आष्टी : बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी-अजित पवार) विरुद्ध सुरेश धस (भाजप) विरुद्ध महेबूब शेख (राष्ट्रवादी-शरद पवार) विरुद्ध भीमराव धोंडे (अपक्ष)
बीड जिल्ह्यातील अष्टी विधानसभा मतदारसंघात चार तगडे उमेदवार निवडणूकीच्या मैदानात समोरासमोर असणार आहेत. या चौरंगी लढतीतील तीन उमेदवारांचा सत्ताधारी महायुतीला पाठिंबा आहे. महायुतीमध्ये ही जागा भाजपाला सुटल्यानंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे बाळासाहेब आजबे यांना तिकिट देण्यात आले.
पण तिकिट न मिळाल्याने नारा भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी देखील अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. येथे महाविकास आघाडीने पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते मेहबूब शेख यांना उमेदवारी दिली.
पंढरपूर: समाधान आवताडे (भाजप) विरुद्ध भगीरथ भालके (काँग्रेस) विरुद्ध अनिल सावंत (राष्ट्रवादी-शरद पवार)
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजपचे आमदार औताडे यांना दोन विरोधकांचा सामना करावा लगत आहे.
येथे महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा वाद सोडवता न आल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षांनी तगडे उमेदवार उभे केले आहेत. भगीरथ भालके हे दिवंगत आमदार भरत भालके यांचे पुत्र असून सावंत हे देखील राजकीय वारसा आहे. या लढतीकडे देखील राज्याचे लक्ष लागले आहे.
कन्नड: उदयसिंग राजपूत (शिवसेना- उद्धव ठाकरे) विरुद्ध संजना जाधव (शिवसेना- एकनाथ शिंदे) विरुद्ध हर्षवर्धन जाधव (अपक्ष)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघात पती-पत्नी एकमेकांविरुद्ध लढत आहेत. मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष उमेदवार आहेत,
तर त्यांची पत्नी आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेनेपक्षातील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी न केलेले नेते उदयसिंग राजपूत यांना तिकीट दिले आहे .
अहेरी: धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी-अजित पवार) विरुद्ध भाग्यश्री आत्राम (राष्ट्रवादी-शरद पवार)
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात वडील आणि मुलीमध्ये लढत पाहायला मिळत आहे. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात त्यांच्याच कन्या लढत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात गेल्या काही निवडणुकींपासून आत्राम कुटुंबातील सदस्यच जिंकत आले आहेत.