भोकर मतदारसंघात मतदारांना डांबून ठेवलं’, काँग्रेसचा खळबळजनक आरोप
Voters were kept waiting in Bhokar constituency', sensational allegation of Congress
नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातील अर्धापूर येथे काही मतदारांना भाजप पदाधिकाऱ्यांनी मंगल कार्यालयात मतदानाची वेळ संपेपर्यंत डांबून ठेवल्याचा आरोप भोकरचे काँग्रेसचे उमेदवार तिरुपती कदम कोंढेकर यांनी केला आहे.
यावर भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना पराभवाची चाहूल लागल्याने असे आरोप सुरू आहेत. कोणालाही डांबून ठेवण्याचा प्रश्नच येत नाही,
असा खुलासा अशोक चव्हाण यांनी केला आहे. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली आहे.
रात्रीच्या 8.30 पर्यंत अर्धापूर येथील बसवेश्वर माध्यमिक विद्यालय मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या. काही काळ मतदान केंद्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आता त्यांना पूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. भोकर मतदारसंघात काँग्रेसकडून तिरुपती कदम कोंढेकर उमेदवार आहेत. तर भाजपकडून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांच्यात लढत आहे.
“असा कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही. आमची सकाळपासूनच विजयाकडे घोडदौड होती. त्यांना आज दुपारपासूनच चाहूल लागली होती की, आम्ही निवडून येत नाही.
त्यामुळे त्यांनी असे बेछूट आरोप करायला सुरुवात केली आहे. इथे पोलीस प्रशासनाने दखल घेतली आहे. पूर्ण सीसीटीव्ही आम्ही मागितला आहे. असे बेछुट आरोप करण्यापेक्षा काही पुरावे असतील तर बोलावं.
त्यांना दिसलं आम्ही निवडून येण्याची शक्यता नाही म्हणून असे आरोप केले गेले आहेत. कुणालाही डांबून ठेवण्याचा प्रश्न भाजपाच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडून अजिबात झाला नाही”, असं अशोक चव्हाण म्हणाले.
नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “नांदेड जिल्ह्यात आज शांततेत पूर्ण मतदान झाले. अर्धापूर येथे सायंकाळी 6 च्या अगोदर मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर आले होते.
त्यांचं मतदान पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाजपने काही मतदारांना मंगल कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याची चौकशी करण्यात येईल”, अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली.