मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाआमदारांना भेटण्यास नकार ;काय घडले कारण ?
Chief Minister Eknath Shinde's refusal to meet MLAs; What happened and why?
राज्यात विधानसभा निवडणुकांचे अनपेक्षित असे निकाल लागले. या निकालाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला तर महायुतीला प्रचंड यश प्राप्त झालं.
त्यानंतर चर्चा उठू लागल्या त्या कोण मुख्यमंत्री होणार याच्या. एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असं म्हटलं जात असताना,
आता भाजपकडून मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे जरा नाराज असल्याचं बोललं जात आहे.
त्यातच निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांनी मौन बाळगल्याचं दिसत आहे. निकाल लागल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे बोलले, त्यानंतर ते माध्यमांशी बोलणं टाळत असल्याचं दिसत आहे.
मुख्यमंत्रिपदाची आशा मावळताना दिसत असताना एकनाथ शिंदे यांनी मौन बाळगलं आहे. तसेच, शिंदेंनी आमदार, खासदारांच्या भेटीगाठीही टाळल्या आहेत. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पसरली आहे.
इतकंच नाही तर एकनाथ शिंदेंनी आमदारांना मुंबईत न थांबता आपल्या मतदारसंघात जाण्याचे आदेश दिले आहेत. आपआपल्या मतदारसंघात जा विजयाचा जल्लोष साजरा करा, विजयी रॅली काढा,
असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. मंत्रिपदासाठी शिंदेसेनेचे अनेक आमदार मुंबईत तळ ठोकून बसले आहेत. मात्र, अद्याप यावर कुठलाही निर्णय झालेला नाही.
इतकंच काय तर मुख्यमंत्रिपदाबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे महायुतीत नेमकं काय चाललं आहे हे सध्या गुपित आहे.
मंत्रिमंडळात सेनेच्या किती आमदारांना संधी मिळणार हे कळू शकलेलं नाही. यंदा महायुती नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांचं टेन्शन वाढलं आहे.
त्यातच आता शिंदेंनी आमदारांना मुंबईत थांबू नका आपआपल्या मतदारसंघात जाण्याचे आदेश दिल्याने चिंता आणखी वाढली आहे.
कारण, भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने शिंदे गटाला मंत्रिमंडळात त्यांच्यापेक्षा कमी मंत्रिपदं मिळू शकतात. त्यातच शिंदेंनी मौन बाळगल्याने चिंता वाढली आहे.