अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या दालनात भेटीला
Uddhav Thackeray meets Chief Minister Fadnavis directly in his office during the session
विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. आदित्य ठाकरे,
अनिल परब, वरुण सरदेसाई, सचिन अहीर या नेत्यांसह ठाकरेंनी फडणवीस यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी फडणवीसांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं सध्या नागपुरात आहेत. काही वेळापूर्वी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले.
ही भेट पूर्वनियोजित असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे आज अधिवेशनात उपस्थित राहिले. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या सगळ्या आमदारांची बैठक घेतली.
यानंतर ते सर्व आमदारांना घेऊन फडणवीस यांच्या भेटीला गेले. मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी ठाकरे फडणवीसांच्या भेटीसाठी गेल्याचं सांगितलं जात आहे.
हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीस विधिमंडळात उपस्थित होते. ते सभागृहात काही वेळ बसले होते.
त्यानंतर ते त्यांच्या दालनात गेले. दरम्यान ठाकरेंनी त्यांच्या भेटीसाठी वेळ मागितली. यानंतर ठाकरे त्यांच्या आमदारांना घेऊन फडणवीसांच्या भेटीला पोहोचले.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्त्वाचा सूर आळवण्यास सुरुवात केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट झाली.
देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण महाविकास आघाडीतील सगळ्या प्रमुख नेत्यांना दिलं होतं. पण विरोधी पक्षांमधील एकही प्रमुख नेता ५ डिसेंबरला आझाद मैदानात झालेल्या शपथविधी सोहळ्याला हजर राहिला नाही.
सगळ्याच नेत्यांची या सोहळ्याकडे पाठ फिरवली. पण यातील बहुतांश नेत्यांनी फडणवीसांना पुढील वाटचालीसाठी फोनवरुन शुभेच्छा दिल्या.
आधी फडणवीसांना फोनवरुन शुभेच्छा देणारे उद्धव ठाकरे आता त्यांच्या प्रत्यक्ष भेटीला पोहोचले आहेत. मुख्यमंत्रिपदी झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी
ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घडामोडी पाहता दोन बड्या नेत्यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.