मंत्रिमंडळात न घेतल्याने शिंदेसेनेच्या आमदाराने व्यक्त केली खदखद

Shinde Sena MLA expresses grief over not being included in the cabinet

 

 

 

महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. या विस्तारामुळे अनेक आमदार नाराज झाले आहेत.

 

भाजपाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावललं असताना शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षातील अनेक इच्छुकांनाही डावलण्यात आलं आहे.

 

तसंच, मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे हेही नाराज असल्याची चर्चा आहे.

 

त्यांनी आज विधानसभेच्या कामकाजात उपस्थित न राहता थेट मुंबई गाठली आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा अधिक अधोरेखित झाल्या आहेत.

“मी नाराज अजिबात नाही. मी लढवय्या कार्यकर्ता आहे. संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. (मंत्रीमंडळात न घेतल्याने) निश्चित दुःख झालं आहे.

 

हे दुःख मी लपवणारही नाही. पूर्वीच्या शिवसेनेत गरीब कार्यकर्त्यांना डावललं जायचं. त्यामुळे असंख्य कार्यकर्ते शिंदेंच्या पाठीशी उभे राहिले.

 

त्यांनी अनेकांना संधीही दिली. पण मंत्रिमंडळात माझं नाव नसण्यामागे शिंदेसाहेब नक्कीच नाहीत,

 

मी गरीब घरातील कार्यकर्ता आहे. शिंदेही गरीब घरातून आले आहेत. त्यामुळे त्यांना माझं दुःख कळतं”, असं प्रकाश सुर्वे म्हणाले.

 

“एकनाथ शिंदे यांना संधी मिळाली, त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. तसंच, मलाही संधी मिळाली असती तर पक्षवाढीसाठी मेहनत घेतली असती.

 

मेहनत करणं हा माझा स्वभाव आहे. काही मोठ्या नेत्यांनी स्वतःला मंत्रिमंडळात येण्यासाठी किंवा त्यांच्या नातेवाईकांना येण्यासाठी प्रचंड दबाव निर्माण केला गेला.

 

त्यामुळे मला डावललं गेलं. पण मी खचून न जाता ताकदीने उभा राहून मुंबई महापालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करणार”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

“आज अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास नव्हता. त्यामुळे मी माझ्या मतदारसंघाचे प्रश्न मांडू शकत नाही. तसंच, मला मंत्रिमंडळात न घेतल्याने माझ्या कुटुंबावर प्रचंड मठा आघात झाला आहे.

 

माझी आई खूप दुःखी होती. त्यामुळे भाजीविक्रेता ते आमदार या संघर्षात माझ्या कुटुंबाने मोठी साथ दिली.

 

त्यामुळे त्यांचं सांत्वन करणं माझं कर्तव्य होतं. माझ्या कार्यकर्त्यांनीही सामूहिक राजीनामे घेण्याचा विचार केला होता.

 

त्यामुळे त्यांची समजूत काढण्याकरता मला अधिवेशन सोडून येथे यावं लागलं”, असं स्पष्टीकरण प्रकाश सुर्वे यांनी दिलं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *