धनंजय मुंडेंचे मंत्रिपद अडचणीत ?
Is Dhananjay Munde's ministerial post in trouble?
केज येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण चांगलेच तापले आहे. या हत्येचे पडसाद काल विधासभेतही उमटले होते.
या प्रकरणी शुक्रवारी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील कोणत्याही राजकीय नेत्याबरोबर संबंध असले तरी
त्याचा कुठलाही मुलाहिजा न बाळगता त्याच्यावर मोक्कानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
या चर्चेनंतर आज धनंजय मुंडे अजित पवार व नंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.
खरं तर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे उप मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
या भेटीनंतर दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल होणार आहे. या भेटीत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवायचे की नाही? याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांनी वाल्मिक कराडचं नाव घेतं धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं होतं. कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
याच कारणामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांना अधिवेशनात टार्गेट केलं होतं. त्यात आता गुरूवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस धनंजय मुंडे अधिवेशनात गैरहजर होते.
त्यामुळे आता त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.त्यात आता अजित पवार, धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.