भुजबळांनंतर राष्ट्रवादीच्या दुसऱ्या बड्या नाराज नेत्याने व्यक्त केली मनातली खदखद

After Bhujbal, the second most disgruntled leader of NCP expressed his grief.

 

 

राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगाव विधानसभेत निसटता विजय मिळाला. प्रतिस्पर्धी उमेदवार देवदत्त निकम यांनी वळसे पाटलांना शेवटच्या फेरीपर्यंत विजयाची प्रतिक्षा करायला लावली.

 

मात्र अटीतटीच्या लढतीत वळसे पाटील १५०० मतांनी जिंकले. राज्याच्या राजकारणात कायमच महत्त्वाचे स्थान मिळालेले वळसे पाटील निसटत्या फरकाने विजयी झाले, ही बोच त्यांना स्वत:ला लागून राहिली आहे. याचवरून आभार दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांना चिमटे काढले.

 

विधानसभा निवडणुकीत मी विजयी झालोय पण सगळीकडे लाजत लाजत फिरतोय. मात्र विरोधातले (शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम) पराभूत होऊनही गावच्या पाटलासारखे फिरतायेत, अशी टोलेबाजी वळसे पाटील यांनी केली.

 

तसेच मागील आठवड्यात उत्साही कार्यकर्त्यांनी मंत्रिपदाची मागणी केल्यानंतर, १५०० हजाराने निवडून आलो म्हणून मंत्री करा, असे पक्ष नेतृत्वाला सांगू का? अशी विचारणा करीत त्यांनी कार्यकर्त्यांचे कान उपटले.

 

हसन मुश्रीफ वगळता जुन्या पिढीतील नेत्यांना दूर सारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीतील नवीन चेहऱ्यांना संधी दिली.

 

तसेच अडीच वर्षांनंतर सध्याच्या मंत्र्यांना बदलून नव्या नेत्यांना त्यांनी मंत्रिपदावर काम करण्याची जबाबदारी दिली. माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद आबा पाटील,

 

बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक अशा नेत्यांना अजित पवार यांनी मंत्री करून महत्वाची खातीही दिली आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी सत्तेत आहे आणि दिलीप वळसे पाटील मंत्री नाहीत अथवा महत्त्वाचे पद नाही, असे प्रथमच घडत आहे.

 

विधानसभा निवडणूक निकाल लागलाय. आपला विजय झाला आहे. आता विधानसभेच्या चर्चांना ब्रेक देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामांना लागा, अशा सूचना वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *