सुप्रिया सुळे म्हणतात, EVMला दोष देता येणार नाही
Supriya Sule says, EVMs cannot be blamed
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून जवळपास प्रत्येक दिवशी ईव्हीएम यंत्रातील फेरफाराचा मुद्द्यावरुन आगपाखड केली जात आहे.
मात्र, हे दोन्ही पक्ष ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन कंठशोष करत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या मित्रपक्षांच्या धोरणाला छेद देणारी भूमिका घेतली आहे.
सुप्रिया सुळे यांनी आपण ठोस माहितीशिवाय ईव्हीएमला दोष देणार नाही, असे म्हटले आहे. त्या बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
ईव्हीएम यंत्रात फेरफार झाल्याचे ठोस पुरावे हाती असल्याशिवाय त्याबाबत मी दोषारोप करणे योग्य ठरणार नाही.
मी याच ईव्हीएम यंत्रावर चार निवडणुका जिंकली आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. ईव्हीएम मशीन आणि मतदार यादीतील घोळामुळे संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे.
या सर्वाचा अभ्यास केला पाहिजे. या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या सगळ्या आक्षेपांमध्ये तथ्य असेल तर त्या गोष्टी बाहेर येतील, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या मुद्द्यावरुन सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला लक्ष्य केले. राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना अशोभनीय आहेत.
परभणीतील घटनाही निंदनीय आहे. अशा प्रकरणांमध्ये केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन चालणार नाही.
या प्रकरणांच्या मुळाशी जाऊन तपास झाला पाहिजे. राज्यात पूर्वी इतके भीतीदायक वातावरण कधीच नव्हते,
आता मलाही भीती वाटू लागली आहे. चित्रपटांमध्ये जे गुन्हेगारीचे चित्र दिसते तेच आता या राज्यात पाहायला मिळत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेले अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ यांच्याविषयी सुप्रिया सुळे यांनी सहानुभूती व्यक्त केली.
भुजबळ साहेब हे राज्याचे एक वरिष्ठ नेते आहेत. ते कुठल्याही पक्षात असले तरी गेल्या 40-45 वर्षाचे त्यांचे योगदान हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.
पवार साहेबांच्या अनेक संघर्षामध्ये माननीय भुजबळ साहेब हे पवार साहेबांबरोबर उभे राहिलेले आहेत.
हे मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यांनी आयुष्यभर खूप संघर्ष केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना भुजबळ साहेबांची जागा ही नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारी असायची, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.