देशमुख हत्या प्रकरण ;मारहाणीचे चार व्हिडीओ पोलिसांच्या हाती
Deshmukh murder case; Four videos of the beating are in the hands of the police

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीचे पथक वेगाने तपासाची चक्रे फिरवत आहे. सीआयडीचे एकूण नऊ पथक या प्रकरणांमध्ये तपास कामी काम करतात.
सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी सीआयडीच्या पथकाने केली आहे. यामध्ये प्रामुख्याने खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या पत्नीची देखील चौकशी करण्यात आली आहे.
तर वाल्मीक कराड यांच्याशी संबंधित असलेल्या आणखी दोन महिलांची देखील काल सीआयडीच्या पथकाने चौकशी केली. आज देखील चौकशीचे हे सत्र सुरू राहणार असल्याची शक्यता आहे.
मारहाणीचे चार व्हिडीओही हाती लागले पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाइलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे काही व्हिडीओदेखील हाती लागले आहेत.
तसेच त्या मोबाइलमधून कोणाला कॉल केले, याचीही माहिती पोलिसांनी घेतली. विशेष म्हणजे यामध्ये काही राजकीय नेत्यांना कॉल झाल्याचे वृत्त दैनिक लोकमतने दिले आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत. चाटे आणि केदार या दोन आरोपींना तांबवा या गावातून ताब्यात घेतले होते,
तर प्रतीक घुले याला स्थानिक गुन्हे शाखेने पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले. विष्णू चाटे याला बीड येथे महामार्गावर पाठलाग करून बेड्या ठोकल्या होत्या. पण अजूनही तीन आरोपी फरार आहेत.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात रडारवर असलेला वाल्मीक कराड लवकरच पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून वाल्मीक कराड फरार आहे. मात्र, तो सोमवारी संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत बीड पोलिसांसमोर आत्मसमपर्ण करेल,
असे सांगितले जात आहे. वाल्मीक कराड हा महाराष्ट्रातच आहे की राज्याबाहेर आहे, याबाबत नेमकी माहिती नाही. तो राज्याबाहेर असल्यास मंगळवारी सकाळपर्यंत पोलिसांना शरण जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे
. आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांच्या पत्नीला रामदास आठवले यांच्या समोरच संताप अनावर झाल्याचे दिसून आले.
संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख म्हणाल्या की, मला तर अक्षरशः असं वाटतंय की, मीच जाऊन कुणाकुणाला मारावे. मला इतकी वेदना सहन होत नाहीय.
आम्ही काय पाप केलं होतं की, आमच्यावर ही वेळ आलेली आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर मला शासनाने सांगावे,
मीच जाऊन त्यांना डायरेक्ट मारुन येईन, इतकी माझ्यात हिंमत वाटायला लागली आहे, असा संताप त्यांनी रामदास आठवले यांच्यासमोर व्यक्त केला.
, आज रामदास आठवले यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना आहे.
या हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. मी या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.
संतोष देशमुख यांची हत्या होऊन 22 दिवस उलटले असले तरी आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. ही फार गंभीर बाब आहे.
तर या प्रकरणातील सोनवणे यांनी तक्रार केल्यानंतर 6 तारखेला गुन्हा दाखल झाला असता तर आज ही वेळ आली नसती, असे त्यांनी म्हटले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयात क्रिमिनल रेट याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या नेटवर्कचे सर्व पाळेमुळे, राजकीय लागेबांधे तथा जिल्हा प्रशासनात होणारा राजकीय हस्तक्षेप व संघटित गुन्हेगारीला मिळणारा राजकीय वरदहस्त
तथा हस्तक्षेप कमी व्हावा, याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य सचिव गृह मंत्रालय (राज्य शासन) व पोलीस प्रमुख यांना द्यावे, अशा मागण्या या करण्यात आलेल्या आहेत.